शिवसेना – भाजप युतीचे साताऱ्यात उमटणार पडसाद

सातारा – शिवसेनेच्या स्वबळाच्या नाऱ्याला भाजपने राजकीय खेळीत गुंडाळत युतीची नाळ पक्की केली. सातारा जिल्ह्यात या युतीचे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने अनेक पडसाद उमटणार आहेत. जावलीत शिवसेनेने जो वीस वर्षापूर्वी जो चमत्कार दाखवला तो इतिहास झाला. मात्र जिल्ह्याच्या राजकारणात आगामी लोकसभेच्या आखाडयात खासदार उदयनराजे भोसले यांना टक्कर देणारा दुसरा तगडा उमेदवार ना शिवसेनेकडे आहे ना भाजपाकडे. सेनेचा विचार केला तर जिल्ह्यात उपद्रव क्षमता आहे पण ती विखुरलेली याउलट भाजपने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात किमान विधानसभेसाठी तरी मोठी ताकत उभी केली आहे. सातारा व वाई खंडाळा म”श्‍वर या दोन विधानसभा मतदारसंघात सेना भाजप युती फार चमत्कार दाखवेल अशी आशा खुद्द पक्षाच्या थिंक टॅकला पण नाही.

मनोमिलनाच्या परिघात तिसरा पर्याय कोणता
सातारा 
सातारा विधानसभा मतदारसंघात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नेटवर्क मोठे आहे. येथे पक्षीय अभिनिवेष कमी आणि राजकारणाचे संदर्भ कट्टर विरोधातील भावकीच्या संदर्भाने आहेत. 2009 साली खंडाळ्याच्या नवख्या पुरुषोत्तम जाधव यांनी शिवसेनेच्या तिकिटावर तब्बल अडीच लाख मते घेतली होती. मात्र तो राजकीय करिष्मा वानवलीचे भूमीपुत्र व परळचे माजी आमदार दगडू दादा सपकाळ यांचा होता. 2014 साली पुन्हा अपक्ष उभ्या राहिलेल्या पुरुषोत्तम जाधवांनी 1लाख 55 हजार मते घेतली होती. युतीच्या संकेतात सेनेने साताऱ्याची जागा रिपाई ला सोडल्याने नाराज जाधवांनी अपक्ष दावेदारी पेश केली. 2019 ला सुध्दा राजकीय परिस्थितीत फारसा फरक नाही. युतीकडे साताऱ्यात लोकसभेसाठी उदयनराजेंना टककर देणारा उमेदवार नाही. सेनेचा आग्रह या जागेसाठी झाल्यास साताऱ्याचे संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील, जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, माजी प्रमुख हर्षल कदम किंवा जावलीतले जुने निष्ठावंत एस. एस. पार्टे यांच्या नावांचा विचार उध्दव ठाकरे यांना करावा लागेल. मात्र सेनेच्या या वाघाची डरकाळी पूर्ण ताकतीने घुमणार का? हा वादाचा विषय आहे. भाजपने जर वाईत चमत्कार घडवला व मदन भोसले यांचे नाव लोकसभेसाठी पुढे आणले तर साताऱ्याच्या राजकीय पटलावर तगडी लढत कदाचित पहायला मिळेल. विधानसभेसाठी साताऱ्यातून एस. एस. पार्टे चंद्रकांत जाधव यांची बाशिंगे तयारच आहेत. कारण मनोमिलनाच्या सातारा तालुक्‍यातील परिघात आजपर्यंत कोणताच तिसरा पर्याय यशस्वी झालेला नाही. भाजपच्या दीपक पवारांची आमदार शिवेंद्रसिंहराजेंना तगडी टक्कर असणार आहे. मात्र पवारांच्या राजकीय विश्‍वासार्हतेवर सातत्याने प्रश्‍नचिन्ह उभी रहात असतात.

भाजपचा चंचूप्रवेश सेनेचे उपद्रवमूल्य
वाई  खंडाळा
सातारा जिल्हयात त्या सर्वात मोठया व एकूण दोन तृतीयांश मतदार संख्या असलेल्या या भागामध्ये खंडाळा तालुक्‍यातील भाजपचा चंचुप्रवेश व सेनेचे महाबळेश्‍वर मधील उपद्रवमूल्य या दोनच गोष्टी जमेच्या बाजू आहेत. मात्र येथील राष्ट्रवादीच्या बालेकिल्याला भगदाड पडेल अशी अजिबात परिस्थिती नाही. खंडाळा तालुक्‍यात सेनेला फार राजकीय ताकत नाही. उलट राष्ट्रवादीची झेडपीची मुलुख मैदानी नितीन भरगुडे ही तोफ कमळाबाईच्या प्रेमात पडली आहे. राजकीय विजनवास असह्य झाल्याने बापू कासावीस झाल्याने त्यांनी भाजपचा उतारा शोध लाय खरा मात्र युतीचे आगामी सहा महिन्यातील राजकीय समीकरणे कशी वळणं घेतात यावर बरीचशी गणिते अवलंबून आहेत. महाबळेश्‍वरमध्ये डीएम बावळेकर हा एक सेनेचा हुकुमाचा एकका आहे तर भाजपने आमदार मकरंद पाटील यांच्या विरोधात कॉंग्रेसच्या मदन भोसले यांना स्व पक्षात आणून राजकीय आखाडा सजवण्यासाठी गळ टाकला आहे. मदन भोसले हे नाणे लोकसभा अथवा विधानसभा या दोन्ही ठिकाणी चालू शकते त्यामुळे सहा तालुक्‍यातील कॉंग्रेस गटाशी असणारी नाळ तोडून मदनदादा भाजपात जाणार का ? सध्या तरी या केवळ राजकीय चर्चाच आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)