भोरमध्ये शिवसेनेची जनजागृती यात्रा
कापूरहोळ – भोर मतदार संघाची परिस्थिती बदलायची असेल तर येथे वर्षानुवर्षे निवडून येणारे लोकप्रतिनिधी बदलणे गरजेचे आहे; त्यामुळेच अगामी विधानसभेसाठी शिवसेनेच्या वतीने प्रतिनिधी बदला परिस्थिती बदलेल, अशी घोषणा देण्यात आली असुन याबाबत व्यापक जनजागृतीसाठी भोर विधानसभा मतदार संघात कुलदीप कोंडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सर्व पदाधिकारी पदयात्रा काढणार आहेत.
शिवसेनेच्यावतीने अयोजीत या पदयात्रेची माहीती कुलदीप कोंडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांच्या समवेत तालुकाप्रमुख दिपक बर्डे, युवासेना अध्यक्ष केदार देशपांडे, नितीन सोनवले, अशोक वाडकर, प्रफुल्ल धुमाळ, नितीन इंगुळकर, युवराज जेधे, अमोल पांगारे व शिवसेना तालुका पदाधिकारी उपस्थित होते.
कुलदीप कोंडे यांनी सांगितले की, भोर मधील जनतेच्या साध्या भोळ्या स्वभावाचा येथील लोकप्रतिनिधींनी कायम गैरफायदा घेतला आहे, अंगारे धुपाऱ्यांची शपथ घेवून वेळ प्रसंगी धमकावून मते मागीतली जातात, फक्त रस्ते, वीज, पाणी म्हणजेच विकास नाही तर नागरीकांचे जीवनमान उंचावणे देखील गरजेचे असते यासाठी कोणताही प्रकल्प गेल्या 40 ते 50 वर्षात झाला नाही, हे सर्व बदलण्यासाठी जनतेमध्ये जागृती होणे गरजेचे आहे, ही जागृती येण्यासाठी व भोर मधील जनतेच्या पाठिशी शिवसेना ठामपणे उभी आहे, हे सांगण्यासाठी शिवसेनेने पदयात्रेचे अयोजन केले असुन रविवारी (दि.25) छत्रपतींनी जिथे स्वराज्याची शपथ घेतली त्या रोहीडेश्वरास अभिषेक करुन आंबवडे येथील नागेश्वराचे दर्शन घेवून वीस गाव खोऱ्यातील आंबाडे येथील जानुबाई मंदिरापासुन पदयात्रेस सुरुवात करणार असुन प्रमुख गावांना भेट देत त्या गावामध्ये स्वच्छता व वृक्षारोपण अभियान राबवून तेथील नागरीकांशी समस्यां विषयी चर्चा करणार आहे. पहिल्या टप्प्यात भोर व वेल्हे तालुक्यातील गावे घेण्यात येणार असुन दुसऱ्या टपप्यात 5 ते 9 सप्टेंबरमध्ये मुळशी तालुक्यातील मुख्य गावात पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेत कुलदीप कोंडे यांच्या समवेत शिवसेनेचे भोर तालुका प्रमुख ज्ञानेश्वर शिंदे, दिपक बर्डे, वेल्हे तालुका प्रमुख शैलेश वालगुडे, मुळशीचे तालुका प्रमुख संतोष मोहळ व सर्व पदाधिकारी व त्या-त्या भागातील शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.





