अर्णब प्रकरणी भाजपने ‘तांडव’ सोडा; ‘भांगडा’ही केला नाही – शिवसेना

शिवसेनेचे शरसंधान: तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प का?

मुंबई  – भाजपने तांडव या वेबसीरिजच्या निर्माते-दिग्दर्शकांविरोधात गुन्हे दाखल केले हे चांगलेच झाले. पण, जवानांच्या हौतात्म्याचा अपमान करणाऱ्या पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले; तर भाजपचे नेते खरे मर्द. मात्र, अर्णब प्रकरणी भाजपने तांडव सोडा; भांगडाही केला नाही, असे शाब्दिक बाण शिवसेनेने सोडले आहेत.

रिपब्लिक टीव्हीचे संपादक असणाऱ्या अर्णब यांचे वादग्रस्त व्हॉटस्‌ऍप चॅट चव्हाट्यावर आले आहे. त्यावरून भाजपवर निशाणा साधताना शिवसेनेने तांडव वेबसीरिजशी संबंधित घडामोडींचा आधार घेतला आहे. देवदेवतांचा उपहास केल्याचा आरोप करत भाजपने तांडवविरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. त्याचा संदर्भ घेऊन शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिकातील अग्रलेखातून भाजपवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे.

तांडवविरोधात उभा ठाकणारा भाजप भारतमातेचा अवमान करणाऱ्या अर्णबविषयी तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प का बसला आहे? अर्णबइतका भारतीय जवानांचा आणि त्यांच्या हौतात्म्याचा घोर अपमान पाकिस्ताननेही केला नसेल. अर्णबला गोपनीय माहिती पुरवून राष्ट्रीय सुरक्षेचा खेळखंडोबा करणारे नक्की कोण होते ते जरा कळू द्या, असे म्हणत शिवसेनेकडून चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.