केडगाव- शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून गुरुवार (दि. 28) शिवतीर्थावर शपथ घेतली आणि केडगाव (ता. दौंड) येथे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
मागील महिनाभरापासून महाराष्ट्र राज्यातील सत्तासंघर्ष सुरू होता. शिवसेना, भाजपा काडीमोड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंड आणि फडणवीस यांचा राजीनामा या सर्व घडामोडींनी राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते.
अखेर महाशिवआघाडीचे नेते उध्दव ठाकरे यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला केडगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे शपथविधीचे प्रक्षेपण लावण्यात आले होते. शपथविधी पार पडला आणि शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई वाटून आणि फटक्यांची आतिशबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी सदाशिव लकडे, राजू शेळके, राजू मासाळ, संजय गरदडे, सनी हंडाळ आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.