मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरील अटकेच्या कारवाईनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊत कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी संजय राऊत यांच्या मातोश्री, पत्नी वर्षा, मुलगी आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी शिवसेना पक्ष आणि आपण स्वत: संजय राऊत यांच्या पाठिशी असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जातात. शिवसेनेत बंड झाल्यानंतर संजय राऊत यांनी भक्कमपणे उद्धव ठाकरे यांची बाजू मांडली. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यातही राऊत यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे ईडीने रविवारी रात्री संजय राऊत यांना अटक केल्यानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज दुपारी भांडुपमधील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार अरविंद सावंतदेखील उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांची भेट घेत त्यांना दिलासा दिला. ही वैयक्तिक आणि कौटुंबिक भेट असल्याचे सांगण्यात आले होते. या भेटीत उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या मातोश्रींच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच शिवसेना आणि आपण स्वत: तुमच्या पाठिशी असल्याचे सांगितले.