छावण्या सुरू करण्यासाठी शिवसेनेचे आंदोलन

बायपासवर रास्तारोको : कार्यकर्त्यांना पोलिसांनी दिली समज

आंदोलन दडपण्याचा प्रयत्न : कार्ले

प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे चार चारा छावण्यांतील जनावरांवर उपासारीची वेळ आली आहे. त्या छावण्या पुन्हा सुरु करण्यात याव्यात यासाठी सनदशीर मार्गाने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. परंतु, पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील परंतु, तालुक्‍यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असा इशारा जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी दिला आहे. छावण्या सुरु होईपर्यत आंदोलन सुरुच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नगर – नगर तालुक्‍यातील चार चारा छावण्यांवर ढिसाळ व्यवस्थापनाचा ठपका ठेवत प्रशासनाने त्या छावण्यांची मान्यता रद्द केली. त्यामुळे जनावरांनावर उपासारीची वेळ आली. प्रशासनाने कारवाई केलेल्या छावण्या पुन्हा सुरु करण्यात याव्यात या मागणीसाठी शेतकऱ्यांसह शिवसेनेच्यावतीने जनावरांसह नगर-पुणे बायपास चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. मात्र, आंदोलनादरम्यान कारवाई केलेल्या छावण्या सुरु करता येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी एकच गोंधळ उडाला.

पोलिसांनी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, नगर तालुका पंचायत समिती सभापती रादास भोर यांच्यासह सुमारे 50 जणांना ताब्यात घेतले असून, शेतकऱ्यांनी जनावरे पोलीस वाहनात घालण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली नगर-पुणे बायपास चौकात रास्तारोको आंदोलन आयोजित करण्यात आले. आंदोलन सकाळी दहा वाजता सुरु केले ते साडेअकरा पर्यंत चालले. यावेळी पुणे-नगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. नगर तालुक्‍यातील चार चारा छावण्यांवर ढिसाळ व्यवस्थापनाचा ठपका ठेवून प्रशासनाने त्यांचे मान्यता रद्द केली आहे. याबाबत शेरे बुकात कारवाईची कसलीही नोंद नाही. छावणीचालकांना कारवाईची कोणतीही कल्पना दिली गेली नाही.

प्रशासनाकडून छावण्यांवर एकतर्फी कारवाई करण्यात आली. चालकांना आपली बाजु मांडण्याची संधी न देता प्रशासनाकडून छावण्या बंद करण्याची कारवाई केली. छावण्या बंद झाल्याने जनावरांची उपासमार होत आहे. त्यामुळे या छावण्या तत्काळ सुरू कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. छावण्यांची मान्यता रद्द केलेल्या गावांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. कारवाई केलेल्या छावण्यांधील जनावरे दुसऱ्या गावच्या छावणीत न्या असा सल्ला प्रशासन शेतकऱ्यांना देत आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. प्रशासन छावण्यांवर एकतर्फी कारवाई करत आहे. त्यामुळे कारवाई केलेल्या छावण्या तात्काळ सुरु करण्यात याव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. आंदोलनात सुमारे 500 शेतकरी जनावरांसह सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)