बीड – शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे अनंतात विलीन झाले आहेत. आज त्यांच्या पार्थिवावर बीड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी रस्ते अपघातात मेटे यांचे निधन झाले होते. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र शिंदे यांसह राज्यातील सर्व मंत्री आणि सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. अखेरचा निरोप देताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले होते. मेटे यांच्या जाण्याने बीड शहरावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघाताची घटना घडली होती. मेंदूला मार लागल्याने जागेवरच मेटे यांचा मृत्यू झाला. त्यांना दवाखान्यात दाखल करताच त्यांना मृत घोषित करण्यात आलं, असं काल डॉक्टरांनी सांगितलं. हा अपघात नेमका कसा झाला याविषयी अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. मेटे यांचं पार्थिव मुंबईवरून बीड शहरामध्ये काल रात्री आणण्यात आले होते. त्यानंतर ते बीड शहरातील शिवसंग्राम कार्यालयासमोर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होते.
अंत्यदर्शन झाल्यानंतर विनायक मेटे यांची अंत्ययात्रा अण्णाभाऊ साठे चौक मार्गे जालना रोडकडून डीपी रोडवर असणाऱ्या विनायक मेटे यांच्या शेतात आणण्यात आले. तिथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विनायक मेटे यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी कार्यकर्ते आणि नागरिकांची गर्दी झाली होती.