शिवकुमार यांचा तुरूंगातील मुक्काम वाढला

नवी दिल्ली -येथील विशेष न्यायालयाने मंगळवारी कॉंग्रेस नेते डी.के.शिवकुमार यांच्या न्यायालयीन कोठडीत 25 ऑक्‍टोबरपर्यंत वाढ केली. त्यामुळे कॉंग्रेसचे कर्नाटकमधील संकटमोचक अशी ओळख असणाऱ्या शिवकुमार यांचा तुरूंगातील मुक्काम वाढला आहे.

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काही दिवसांपूर्वी शिवकुमार यांना मनी लॉण्डरिंग प्रकरणी अटक केली. त्यांना सध्या दिल्लीतील तिहार तुरूंगात ठेवण्यात आले आहे. याआधी न्यायालयाने शिवकुमार यांना जामीन मंजूर करण्यास नकार दर्शवला होता. शिवकुमार हे प्रभावी व्यक्ती आहेत.

त्यांची जामिनावर सुटका केल्यास ते साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतात किंवा कागदपत्रांत फेरफार करू शकतात, असे त्यावेळी न्यायालयाने म्हटले होते. त्यांच्या कोठडीची मुदत संपल्याने ईडीने ती वाढवण्याची विनंती न्यायालयाला केली. ती मान्य झाल्याने शिवकुमार यांचा तुरूंगातील मुक्काम लांबला आहे. शिवकुमार यांच्यावर करचुकवेगिरीचा आणि कोट्यवधी रूपयांचे हवाला व्यवहार केल्याचा आरोप आहे. त्यावरून प्राप्तिकर विभागाने मागील वर्षी आरोपपत्र दाखल केले. त्याचा आधार घेऊन ईडीने मागील वर्षीच शिवकुमार यांच्याविरोधात मनी लॉण्डरिंगचा गुन्हा दाखल केला.

Leave A Reply

Your email address will not be published.