सासवडमध्ये शितोळे सरकारांचा तंबू सज्ज

माऊली आज, उद्या सासवड मुक्‍कामी

सासवड -संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा लाखो वैष्णवांसह शुक्रवारी (दि. 28) त्यांचे धाकटे बंधू संत सोपानकाकांच्या सासवडनगरीत दोन दिवसांच्या मुक्‍कामासाठी दाखल होणार आहे. पालखीच्या वास्तव्याकरता परंपरेनुसार अंकलीच्या शितोळे सरकारांचा तंबू उभारून सज्ज झाला आहे.

आळंदी ते पंढरपूर या मार्गावरील तंबूत असणारा हा पहिला मुक्‍काम असून पालखी सोहळ्याचे राजाभाऊ चोपदार यांच्या मार्गदर्शनाखाली तंबू उभारणीचे काम होते. तंबूमध्ये एल ई डी लाईटची व्यवस्था केलेली आहे. तसेच तंबूच्या खांबांना झळाळी देण्यात आल्याची माहिती शितोळे सरकारांचे प्रतिनिधी हेमंत निखळ यांनी दिली. कर्नाटक-बेळगाव येथील अंकलीच्या उर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या घराण्यात सुमारे 200 वर्षांपासून पालखीच्या तंबूचा त्याच प्रमाणे माऊलींच्या अश्‍वांचा मान असून ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याकडून हा मान त्यांचाकडे आल्याचे निखळ यांनी सांगितले.

आषाढीवारीत माऊलींसाठी रोजच्या पहाटेच्या नैवद्याचा मान देखील शितोळे सरकारांचा असून हा नैवद्य फक्‍त पुरणपोळीचाच असतो. तळावर उभारण्यात आलेल्या अष्टकोनी आकाराच्या तंबूची लांबी 28 फूट, रुंदी 18 फूट तर उंची 14 फूट असून तो पूर्णतः पाणी व अग्नी विरोधक आहे. तंबूमध्ये सीसीटीव्ही कॅमेराची व्यवस्था करण्यात आली आहे. माऊलींचा हा तंबू उभारणीसाठी कोणत्याही स्वरूपाचे नट बोल्ट वापरले नसून हा तंबू केवळ अर्धा तासात उभारता तसेच काढता येतो असेही निखळ यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.