शिरूरच्या राजकारणाला कलाटणी मिळणार

निर्णायक मते राष्ट्रवादीच्या झोळीत : कोल्हेंचे मताधिक्‍य विधानसभेसाठी पोषक

– मुकुंद ढोबळे

शिरूर – गेल्या पाच वर्षांत शिरूर तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेस बऱ्याचअंशी कोमात गेली होती. गत लोकसभा निवडणुकीत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना मिळालेले मताधिक्‍य, तसेच विधानसभेला राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक पवार यांचा पराभव आदी कारणावरून राष्ट्रवादी कोमात गेली होती. त्यानंतर तालुक्‍यातून स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने कंबर कसून सत्ता खेचून आणली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने अभिनेते डॉ, अमोल कोल्हे यांच्या रुपाने नवा चेहरा दिल्यामुळे खऱ्या अर्थाने परिवर्तनाची लाट उसळली. मरगळलेल्या राष्ट्रवादीत कोल्हे यांच्यामुळे चेतना जागरूक झाल्या. शिवसैनिकांमधील मतभेद, मुस्लीम आणि माळी समाजाचा विरोधी कौल, खासदारांचा अंहकार आदी कारणे शिवसेनेला पराभवाच्या खाईत लोटणारी ठरली.

शिरूर लोकसभा मतदारसंघांत गेल्या पंधरा वर्षांपासून शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा एकहाती झंझावात सुरू होता. या कालावधीत राष्ट्रवादीची डाळ शिजली नाही. राष्ट्रवादीने अनेक प्रयोग करून पाहिले. मात्र, आढळराव यांचा पराभव करण्यात राष्ट्रवादीला नेहमीच अपयश आले होते. गेल्या वेळच्या निवडणुकीत आमदार दिलीप वळसे पाटील यांना आखाड्यात उतरविण्याची तयारी केली होती. मात्र, त्यांनी नकारघंटा वाजविल्यानंतर ऐनवेळी नुरा कुस्तीप्रमाणे देवदत्त निकम यांना मैदानात उतरविले. मात्र, आढळराव पाटील यांचा प्रचंड जनसंपर्क, विकासकामे, तळागाळातील लोकांशी जोडलेली नाळ, राष्ट्रवादीतील फुटीरांचा पडद्याआडून मिळत असलेली साथ त्यांच्यासाठी गेल्या पंधरा वर्षांत जमेच्या बाजू ठरल्या होत्या. शिरूरचा गड राष्ट्रवादीच्या हातात नसल्याची सल राष्ट्रवादीला बोचत होती. मात्र, आढळरावांविरोधात तगडा उमेदवार मिळत नव्हता. लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी शिरूरमधील कार्यक्रमात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: शड्डू ठोकून आखाड्यात उतरण्याचे वक्‍तव्य केले होते. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनीही सूचक वक्‍तव्य केले होते. त्यावेळी खासदार आढळराव पाटील हे बेफिकीर राहिले होते. अभिनेते डॉ. कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर शिरूरचे वातावरण बदलायला सुरूवात झाली. त्याचा परिणाम जातीवर गेला. त्यातून एकेकाळी माळी समाजाने आढळरावांच्या झोळीत भरभरून मतदान केले. त्यांनीही शिवसेनेची साथ सोडली. तसेच कोल्हे यांची प्रतिमा जनमाणसात रूजलेली होती. त्याचा फायदा राष्ट्रवादीला झाला.

तगडे आणि प्रबळ असलेल्या आढळरावांविरोधात नवखे, उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रचारात पहिल्यापासून आघाडी घेतली होती. आढळरावांनी आतापर्यंत हॅटट्रिक साधली होती. आता ते विजयी चौकार मारण्याच्या तयारीत असताना कोल्हे यांनी चपळ क्षेत्ररक्षणाने त्यांचा चौकार अडवून त्यांना धावचित केले.

शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मातब्बर नेत्यांनी कोल्हे यांच्या प्रचारासाठी जीवाचे रान केले. त्यांच्या एकोपा हा मताधिक्‍यांसाठी पोषक ठरला आहे. हीच विजयाच्या कामाची पोचपावतीच आहे. शिरूर हवेलीमध्ये माजी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, मंगलदास बांदल, सर्व कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकदिलाने अमोल कोल्हे यांचे काम केले. त्यामुळे मतदारसंघातून कोल्हे यांना मोठे मताधिक्‍य मिळाले आहे.

खासदार आढळराव पाटील यांची मोठी चलती होती. निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. परंतु आढळराव-पाटील यांचा पराभव अशक्‍य असल्याचे अनेकांना वाटत होते. परंतु अमोल कोल्हे हे छत्रपती संभाजी मालिकेमुळे सर्वांच्या मनामनात पोहोचले होते. महिलावर्ग, तरुण-तरुणींमध्ये त्यांची क्रेझ होती. त्यात खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शिवसैनिकांची दमदार फळी निर्माण करता आली नाही. कोल्हे यांची उमेदवारी जाहीर होताच खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्यांच्या जातीचा उल्लेख केला. त्यामुळे अनेक भागांमध्ये नाराजीचा सूर उमटत होता. शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीचा उलटा परिणाम झाला आहे. अमोल कोल्हे यांचे आव्हान जरी खासदार शिवाजीराव आढळराव यांना तगडे वाटले नव्हते तरी त्यांच्या मनामध्ये मात्र गर्वाने घर केले होते. मी तीन लाखांपेक्षा जास्त मताधिक्क्‌याने निवडून येईल, लिंबुटिंबूबरोबर लढत नाही. आदी कारणे आढळराव पाटील यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्या आहेत.

शिरूर तालुक्‍यामध्ये शिवसैनिकांमध्ये तीन ते चार गट होते. या गटांमध्ये कधी समझोता घडवून आणण्यात खासदार शिवाजीराव पाटील यशस्वी ठरले नाहीत. त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. निवडणूक काळामध्ये उपजिल्हाप्रमुखांची गाडी फोडणे, जाहीर कार्यक्रमातशिवसैनिकांमध्ये बाचाबाची, मतभेद, टोकाचा संघर्ष हे मतदानावर परिणाम करणारे ठरले. शिरूर मतदारसंघांमध्ये भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करीत होता. परंतु शिवसैनिकांमध्ये भाजपा कार्यकर्ते इतका उत्साह दिसून आला नाही. शिरुर मतदारसंघांमध्ये दहा ते पंधरा कार्यकर्ते शिवसैनिक म्हणजे शिवसेनाचा बोलबाला झाला होता. यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. शिरूर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने कोल्हे यांना वीस हजारांवर मताधिक्‍य मिळाले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील यांना सुमारे 53 हजारांचे मताधिक्‍य मिळाले होते. त्यामुळे शिरूरची वजाबाकी आढळरावांच्या पराभवास हातभार लावणारी ठरली. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे बाबुराव पाचर्णे यांनी विजय मिळविला होता. त्यामुळे राष्ट्रवादीला हा पराभवाचा घाव जिव्हारी लागला होता. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने एकहाती सत्ता काबीज केली होती. शिरूर नगर परिषदेत शिरूर विकास आघाडी आणि राष्ट्रवादीने सत्ता काबीज केली. बाजार समिती व खरेदी- विक्री संघाच्या निवडणुकीत आमदार पाचर्णे यांच्या गटाला धूळ चारीत राष्ट्रवादीने कमबॅक केले. त्यामुळे शिरूरच्या राजकारणात राष्ट्रवादीसाठी सकारात्मक कलाटणी देणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.