शिरूर मतदार संघ : शिवसेनेला विजयाची खात्री तर राष्ट्रवादीकडूनही पक्का दावा

पुणे – शिरूर लोकसभा मतदार संघ नेहमीच राष्ट्रवादी कॉंग्रेसला पोषक राहिला आहे. परंतु, लोकसभेला मात्र खासदार शिवसेनेचाच निवडून येत असल्याचा इतिहास आहे. त्यात यावेळी आमदारही भाजपचेच असल्याने युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचाराला मोठा जोर लागला होता; परंतु ग्रामपंचायती, बाजार समित्या, सहकारी साखर कारखाने यांसह जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व कायम असल्याने याच जोरावर राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही लोकसभेकरिता पक्की मोट बांधली होती. याच बळावर राष्ट्रवादीकडून शिवाजी आणि संभाजी म्हणून ओळख असलेले डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली.

अभिनेता आणि नवा चेहरा म्हणून डॉ. कोल्हे यांना प्रचारादरम्यान मिळालेला प्रतिसाद शिवसेनेला धडकी भरविणारा ठरल्याने या मतदार संघातही विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. विशेष म्हणजे, शिरूर मतदार संघात सर्वाधिक मतदार असलेल्या हवेलीतून ज्या उमेदवाराला अधिक मतदान होईल, त्याचा विजय निश्‍चित मानला जात आहे. सध्या, दोन्ही पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते हवेलीतून सर्वाधिक मतदान झाल्याचा दावा करीत आहेत. यामुळे शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील खासदारकीचा चौकार मारणार की त्यांची विजयी घोडदौड राष्ट्रवादीचे डॉ. कोल्हे रोखणार हे गुरूवारी (दि. 23) स्पष्ट होणार आहे.

शिरूर मतदारसंघात विजयाचा चौकार शिवाजीराव आढळराव मारणारच असा दावा शिवसेनेकडून केला जात असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व नेतेमंडळींनी एकोप्याने डॉ. अमोल कोल्हे यांच्या विजयासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. प्रत्येक सभेला व्यासपीठावर लावलेली हजेरी व मतदारांना मते देण्याचे केलेले आवाहन यामुळे शिरूर मतदारसंघात डॉ. कोल्हे यांच्याकरिता चांगले वातारण निर्माण झाले होते. त्यातच ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात जातीपातीच्या मुद्‌द्‌यावर आल्यानंतर या मतदारसंघातील खेड तसेच हडपसर येथून डॉ. कोल्हे यांना मतांची मोठी रसद मिळाल्याचे बोलले जात आहे. या मतदारसंघात हडपसर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार असल्याची नोंद असल्याने तसेच भोसरीतूनही राष्ट्रवादीने आघाडी घेतली असल्याचे बोलले जात असल्याने हे अंदाज डॉ. कोल्हे यांच्या विजयाकडे अंगुली निर्देश करीत आहेत; परंतु, खासदार म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही भोसरी तसेच खेडमध्ये विकासकामांच्या माध्यमातून शिवसेनेचे चांगले बस्तान बसविले असल्याने तसेच खेडसह आंबेगाव आणि जुन्नर हे विधानसभा मतदारसंघ आढळरावांच्या विचारांचे असल्याचे मानले जात असल्याने हवेली मतदासंघातील मतांची तूट झाली असली तरी ती येथून भरून निघून आढळराव हेच मतांची आघाडी घेत विजयी होतील, असा छातीठोक दावा शिवसेनेकडून केला जात आहे.

शिरूर-हवेली मतदार संघाचा विचार करता पूर्व हवेली भागात डॉ. कोल्हे यांच्या बाजूने वातावरण चांगले राहिले आहे. परंतु, या मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य तसेच काही ग्रामपंचाती भाजप तसेच शिवसेनेच्या ताब्यात असल्याने बहुतांशी गाव, गटांतून शिवसेनेला मतदान झाल्याचे अंदाज वर्तविले जात आहेत. यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. कोल्हे यांची पूर्व हवेलीतूनही पिछेहाट होऊ शकते, अशा काही जर-तरच्या मुद्‌द्‌यांवर या दोन्ही उमेदवारांचा निकाल पूर्व हवेलीच्या पट्ट्यातून होणार असल्याचेच संकेत मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला विजयरथात स्वार होऊन विजयाचा चौकार मारणार असल्याचा मानस असलेले लोकाभिमुख उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रचाराच्या अखेरच्या टप्यात पूर्व हवेलीत तळागळातील मतदारांशी संपर्क साधला आणि याचाच परिणाम म्हणून या भागातून आढळराव यांना मोठी आघाडी मिळाली असल्याची चर्चा आहे.

हवेली तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील गटबाजी सर्वश्रुत असताना देखील या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत डॉ. कोल्हे यांच्यासाठी मोठी फौज निवडणूक रिंगणात उतरविली होती. यामुळे हवेलीतील गावोगावी कोल्हे यांचा प्रचार झाला. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांतील अंतर्गत बंडाळीमुळे याचे परिवर्तन मतांमध्ये होऊ शकेल काय? अशीही शंका काही राजकीय विश्‍लेषक घेत आहेत. तर, हवेलीतील यशवंत सहकारी साखर बंद असल्यानेही शेतकरी वर्गाची मोठी नाराजी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात होती. याचा फायदा डॉ. कोल्हे यांना होईल, असाही अंदाज बांधला जात आहे.

याशिवाय शिरूर मतदार संघातील पूर्व हवेलीत शिवसेना-भाजपाचे मतदान स्थिर असल्याने या भागात आढळराव यांना आघाडी घेणारी चांगली मते मिळाली असल्याचे तसेच नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा पंतप्रधान करण्याकरिताचे मतदारांना करण्यात आलेले भावनिक आवाहनही आढळराव यांच्या विजयातील महत्त्वाचे कारण ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.