शिरूर (प्रतिनिधी) : येथील रामलिंग रोड भागात राहणारे व रांजणगाव औद्योगिक वसाहत येथे एका नामांकित कंपनीत काम करणाऱ्या दोघा कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे.
हे दोन्ही कर्मचारी शिरूर शहराजवळील रामलिंग रोड या परिसरात राहात असून, हे दोघे काही दिवसांपूर्वी चेन्नई येथून कंपनीत कामासाठी आले होते. आल्यानंतर त्यांना होम क्वारंनाटाईन करण्यात आले होते. त्यांचे कोरोना तपासणी करीता नमुने पाठवले असता त्यांचा आज कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रामलिंग रोड मधील एका सोसायटीत हे दोघे राहात असल्याने या भागात खळबळ उडाली असून, नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिरूर रामलिंग ग्रामपंचायतीच्या वतीने शिवरक्षा आणि गिताजंली काॅलनी या परिसरात राहणाऱ्या बाधित कर्मचाऱ्यांच्या परिसरात जंतुनाशक फवारणी करण्याचे काम सुरू असल्याचे सरपंच नामदेव जाधव यांनी सांगितले आहे. तसेच या परिसरातील नागरिकांनी तोंडाला मास्क लावावे, सोशल डिस्टन्स पाळावा, विनाकारण घराच्या बाहेर पडू नये, गर्दी करू नये व शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन देखील सरपंच नामदेव जाधव यांनी केले आहे.