शिरूर (प्रतिनिधी) : शिरूर-नगर हद्दीमध्ये प्रीतम प्रकाश नगर व महादेव नगर येथे दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. त्यामुळे प्रीतम प्रकाश नगर, महादेव नगर, विठ्ठलनगर व जोशी वाडी ही चार शिरूर शहरातील उपनगरे सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केली आहेत. त्यामुळे या भागातील अधिकारी,कामगारांना येण्या-जाण्याचा प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तरी या भागातील कामगार व अधिकारी मोठ्या प्रमाणात रांजणगाव औद्योगिक वसाहतीत कामाला जातात. यांनाही हा नियम लागू आहे, या भागातील कामगारांना व अधिकाऱ्यांना कामावर येण्यास प्रतिबंध करावा व त्याचे पालन औद्योगिक वसाहतीतील सर्व कंपनी व्यवस्थापनाने करावे अन्यथा कंपनी व्यवस्थापन विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा शिरूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा असि. इन्सिडेंट कमांडर महेश रोकडे यांनी दिले आहेत.
शिरूर औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रीतम प्रकाश नगर, महादेव नगर, विठ्ठल नगर व जोशीवाडी या भागातून रांजणगाव औद्योगिक वसाहतीत अधिकारी-कर्मचारी कामासाठी जात असतात. परंतु शिरूर शहरात या भागात कोरोनाव्हायरसचे रुग्ण सापडले असल्याने येथील अधिकारी व कामगार यांना 14 दिवस नोकरी व्यवसाय व प्रवास करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. याची खबरदारी सर्व रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कंपनी व्यवस्थापनाने घ्यावी असे या पत्रात म्हटले आहे.
या नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यवस्थापनावर भारतीय साथ रोग अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही लेखी पत्राद्वारे शिरूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिला आहे.