हवेलीतून होणार शिरूरचा आमदार?

पुणे – विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले असतानाच राजकीय पक्षांकडून अद्यापही उमेदवार निश्‍चित करण्यात आलेले नाहीत. शिरूर-हवेली मतदारसंघात तर गोंधळाची स्थिती आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघातील नेहमीच दुर्लक्षित राहिलेला हवेलीचा भाग निवडणुकीला कलाटणी देणारा ठरणार आहे. मतदारांची संख्या वाढल्याने हवेलीतूनही शिरूरचा आमदार होऊ शकतो, अशी राजकीय गणिते मांडली जात आहेत.

शिरूर-हवेली विधानसभेच्या राजकीय “गोंधळा’त हवेलीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडे नेहमीच दुर्लक्ष होत आले आहे. हा मतदारसंघ शिरूर नावाने ओळखला जात असल्याने या भागाचे प्रतिनिधित्व शिरूर तालुक्‍यातील काही गावातील विशिष्ठ मंडळींच्या अवतीभोवतीच फिरल्याचे लक्षात येते. परंतु, शिरूरच्या विकासाचा लेखा-जोखा काढला तर तालुक्‍यातील अनेक मूलभूत प्रश्‍न आजही सुटलेले नाहीत. या तुलनेत हवेली तालुक्‍यातील पदाधिकाऱ्यांच्या वाट्याला जी काही पदे आली.

त्यातूनही या भागातील प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न केला गेला; परंतु हवेली तालुक्‍यातील पदाधिकाऱ्यांची बोळवण करण्याची राजकीय पक्षांची पद्धत जुनीच आहे. हवेली भागातील मतदारांची वाढती संख्या तसेच तेवढेच तुल्यबळ उमेदवार या भागात असल्याने हवेली भागातील उमेदवारांना आमदारकीची संधी दिली जावी, असाही सूर आता निघू लागला आहे.
शिरूर विधानसभा मतदारसंघाला हवेलीतील तालुक्‍यातील गावे जोडण्यात आली आहेत. शिरूर-हवेली मतदारसंघात

2014 मध्ये विधानसभेकरिता साधारणपणे 2,37,723 मतदार होते. यावर्षी करण्यात आलेल्या मतदार गणनेनुसार मतदारांची संख्या 12,212 ने वाढली आहे. यामध्ये हवेलीतील मतदारांची संख्या अधिक आहे. गेल्या काही निवडणुकीचा इतिहास पाहिला तर शिरूर मतदारसंघात सातत्याने आमदार बदलला जात आहे. यामध्ये हवेलीतील मतांचा वाटा मोठा राहिला आहे. हवेली परिसराचा विचार करता या भागात शहरीकरणाचे प्रमाण मोठे आहे, त्यामुळे सुशिक्षित मतदारांचा मोठा भरणा या भागात असल्याने हवेलीतील मतदार सुज्ञ असल्याचे मानले जाते. शिरूरमध्ये पक्ष, धर्म, जात-पात यावर राजकारण केले जात असले तरी हवेलीतील मतदार याला छेद देतात. या भागातून नेहमीच उमेदवार कोण ते पाहून मतदान झाले आहे. त्यामुळे हवेली भागातून पडणारी मतं नेहमीच कलाटणी देणारी ठरलेली आहेत.

यावर्षीची विधानसभा निवडणूक लढविण्याचे काम सोपे नाही. शिरूर-हवेली मतदारसंघात तर आमदारकीचा गुंता वाढला आहे. शिरूर तालुक्‍यात यावेळी मतांची मोठी विभागणी होणार आहे. त्या तुलनेत हवेलीतील मतं एकगठ्ठा पडू शकतील, ही एकगठ्ठा मतं मिळवणारा उमेदवारच शिरूर-हवेलीत मतदारसंघातून विजयी होऊ शकतो. यामुळे राजकीय पक्षांनीही यावेळी नवा चेहरा समोर आणण्याकरिता हवेलीतील इच्छुक उमेदवारांचा पर्याय ठेवला आहे. राजकारणात काहीही होऊ शकते, याचा प्रत्यय शिरूर-हवेलीमध्ये नेहमीच आला आहे. यावेळीही असेच काही घडेल, ही शक्‍यता नाकारता येणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.