शिरुर, मावळातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार 12 एप्रिलला

पिंपरी – शिरुर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा करुन प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. वंचित बहुजन आघाडी वगळता इतर पक्षांकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु सर्वच पक्षांनी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. तसेच प्रशासनाने देखील आपली तयारी सुरू केली आहे. मावळ लोकसभा निवडणुकीसाठी 2 एप्रिल रोजी अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार असून याच दिवसापासून अर्ज भरण्यास प्रारंभ होईल. तसेच 9 एप्रिल ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे, 10 एप्रिलला अर्ज छाननी होईल आणि 12 एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल. त्यामुळे 12 एप्रिल रोजी निवडणुकीच्या रणांगणात किती उमेदवार असतील हे स्पष्ट होणार आहे.

प्रशासन निवडणुकांसाठी सज्ज झालेले पहायला मिळत आहे. शिरुर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठीची अधिसूचना 2 एप्रिल रोजी प्रसिध्द होणार असून त्याच दिवशीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. 12 एप्रिल रोजी चित्र स्पष्ट झाल्यानंतर उमेदवारांना प्रचारासाठी 14 दिवसांचा वेळ मिळेल. विस्ताराने मोठ्या असलेल्या दोन्ही मतदारसंघात उमेदवारांना मतदारापर्यंत पोहचण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश असलेल्या शिरुर व मावळ या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांसाठी निवडणूक विभागाने जय्यत तयारीला सुरवात केली असल्याचे दिसत आहे. या दोन्ही मतदारसंघाचा विस्तार मोठा असल्याने उमेदवारांबरोरच निवडणूक विभागालाही धावपळ करावी लागत आहे. निवडणुका 29 एप्रिलला असल्या तरी आत्तापासुनच निवडणूक विभागाने तयारी केली आहे. सध्या अंतिम मतदार यादी तयार करण्याचे काम सुरु असून नवीन मतदारांची यादी येत्या दोन दिवसात प्रसिध्द होणार आहे, त्यानंतर किती मतदार वाढले हे स्पष्ट होणार आहे.

संवेदनशील मतदान केंद्राची यादी लवकरच जाहीर
सध्या निवडणूक विभागाच्या वतीने मतदारसंघातील संवेदशनशील मतदान केंद्राची यादी पोलिसांच्या मदतीने काढण्यात येत आहे. मतदाना दरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून निवडणूक विभाग तसेच पोलीस दलाकडूनही विशेष पर्यत करण्यात येणार आहेत. मतदान केंद्राची संख्या वाढण्याची शक्‍यता असून लवकरच संवेदनशील मतदान केंद्राची यादीही निवडणूक विभागाच्या वतीने जाहीर करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.