न्हावरे(प्रतिनिधी) : न्हावरे ( ता.शिरूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंदा सुभाष शेंडगे यांची आज(दि.१२) बिनविरोध निवड झाली. सरपंच ताई तांबे यांनी आपल्या इतर ग्रामपंचायत सदस्य सहकाऱ्यांना सरपंच पदाची संधी मिळावी म्हणून नुकताच सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सरपंच पदाच्या निवडीसाठी निवडणूक घेण्यात आली.
सध्याच्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसींग ठेवून ग्रामपंचायत सदस्यांच्या विशेष बैठकीत मंदा शेंडगे यांचा सरपंच पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने सरपंचपदी मंदा शेंडगे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा खैरे व सहायक निवडणूक अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी पी.सी.केदारी यांनी जाहीर केले.
आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महिन्यांसाठी असलेल्या सरपंच पद निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.सरपंच मंदा शेंडगे यांच्या निवडीने न्हावरे परिसरातून समाधान व्यक्त होत आहे. निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच मंदा शेंडगे यांचा गावातील विविध मान्यवर व संस्थांच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला.