शिरूर लोकसभा मतदार संघ भाजपनेच लढवण्याची मागणी !

  • भाजपा तालुका अध्यक्षांची मागणी ; अध्यक्षांनी मांडले ठराव
  • शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढली असल्याचा विकास रासकर यांचा दावा

हडपसर: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपाची अखेर युती झाली. दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी युतीसंदर्भात माहिती दिली. मात्र, शिरूर लोकसभा मतदार संघातील भाजपाच्या स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मात्र वेगळी भूमिका आहे. युती झालीच तर शिरूर येथील जागा शिवसेनेकडून काढून भाजपकडे घ्यावी किंवा भाजपने स्वबळावर शिरूर लोकसभा लढवावी, अशी भूमिका शिरूर लोकसभा मतदार संघातील काही तालुका अध्यक्षांच्या एका गटाने घेतली आहे.

शिवसेनेसोबत गेल्यानंतर भाजपची फरफट होते. शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद मोठी आहे. त्यामुळे स्वबळावर लढल्यास भाजपला फायदा होईल. स्वबळावर निवडणुका लढवण्याची आमची तयारी असून, त्याचा पक्षाला फायदाच होईल, असे प्रभारींना पटवून देत तसे ठरावही येथील पदाधिकाऱ्यांनी केले आहेत. शनिवारी खेड-आळंदी, आंबेगाव व जुन्नर या तीनही ठिकाणी तालुकानिहाय बैठका झाल्या. त्यावेळी शिरूर लोकसभा मतदार संघाचे प्रभारी शिवाजीराव भुजबळ, महाराष्ट्र प्रदेश भाजपा ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष विकास रासकर, सोशल मीडियाचे प्रमुख सुधाकर राजे व विविध आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

खेड-आळंदी येथील तालुका अध्यक्ष अतुल देशमुख व पदाधिकारी यांच्या बैठकीत शिरूर लोकसभा मतदार संघ स्वबळावर लढायचा किंवा युती झाल्यास तो शिवसेनेकडून काढून तो भाजपकडे घ्यायचा, असा ठराव मांडला आहे. त्याचप्रमाणे आंबेगाव मतदार संघात अध्यक्ष संजय थोरात, जयसिंग एरंडे, भानुदास काळे यांच्यासह अन्य पदाधिकारी यांच्याकडून असाच मागणीचा ठराव करण्यात आला. जुन्नर तालुका अध्यक्ष भगवानराव घोलप तसेच महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्वाती डुले यांनीही शिरून लोकसभा ही स्वबळावर लढण्याची मागणी केली आहे.

एकंदर मतदार संघातील भोसरी, शिरूर आणि हडपसर मतदारसंघात असलेले भाजपचे आमदार महेश लांडगे, बाबुराव पाचर्णे व योगेश टिळेकर यांना मिळालेले मताधिक्‍य चांगले आहे. याशिवाय मतदारसंघात जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सदस्य, पालिकेत भाजपा नगरसेवक जास्त आहेत, काही नगरपालिका आणि ग्रामपंचायतचे सरपंच भाजपाचे आहेत.त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाची ताकद मोठी आहे. त्यामुळे तिन्ही तालुक्‍यात झालेल्या बैठकीत तालुका अध्यक्ष व उपस्थित पदाधिकारी यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची मागणी केल्याची माहिती भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विकास रासकर यांनी दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)