शिरूर- हवेलीत आयारामांचा करिष्मा घटला

आमदार अशोक पवार यांच्या समर्थकांनी विजय खेचून आणल्यामुळे भाजपला “दे धक्‍का’

शिरूर – शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक पवार यांनी भाजपाचे विद्यमान आमदार बाबूराव पाचर्णे यांचा 41 हजार 504 मतांनी दारूण पराभव केला. त्यामुळे शिरूर- हवेलीची निवडणूक एकतर्फी झाली. शिरूर – हवेली मतदारसंघामध्ये घड्याळाची टिक्‌टिक्‌ वाढली, तर कमळ कोमजले आहे.

मतदारसंघामध्ये दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे आमदार पाचर्णे यांची पार्टी झाली होती; परंतु एकाकी लढा देणाऱ्या अशोक पवार यांच्या बाजूने मतदारांनी मतदान केल्याने मतदारसंघात आयारामांचा करिष्मा घटला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बाबूराव पाचर्णे यांच्याकडे निवडणुकी काळामध्ये नियोजन दिसून आले नाही. भाजपाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिरूर शहरात येऊन छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. शहरातील जैन समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहणे, याचा फटका नागरिकांनी मतदानातून भाजपाला दिला आहे. शिरूर पंचक्रोशी हा भाजपा उमेदवार पाचर्णे यांचा बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्यात पाचर्णे यांचा मुलगा राहुल पाचर्णे यांचा जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव झाला होता. त्याचप्रमाणे या निवडणुकीत पाचर्णे यांना शिरूर पंचक्रोशीने ठेंगा दाखवला आहे.

शिरूर शहर व पंचक्रोशीत पाचर्णे यांना मताधिक्‍य मिळेल, असे त्यांना वाटत होते; परंतु पाचर्णे यांचा बालेकिल्ला राष्ट्रवादीचे अशोक पवार यांनी पूर्णपणे भेदून काढला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, राजेंद्र जासूद, ज्ञानेश्‍वर कटके यांच्यासह दिग्गज असताना भाजपाचा पराभव झाला आहे. शिरूर- हवेली तालुक्‍यामध्ये पाचर्णे यांनी ठोस विकासकामे केली नसताना तीन हजार कोटींची विकासकामे केल्याचा दावा त्यांनी केला होता. राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांनी 2009 ते 14 या कार्यकाळात केलेली विकासकामांची भुरळ आजही मतदारांमध्ये होती. पवार यांनी या निवडणुकीत केलेले नियोजन त्यांना विजयासमीप घेऊन गेला आहे.

अशोक पवार यांच्या नियोजनामुळे मतदारांचा कौल

शिरुर विधानसभा मतदारसंघात पवार यांनी घोडगंगा सहकारी साखर कारखाना, शिरुर नगरपरिषद, जिल्हा परिषद पंचायत समिती, शिरूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, शिरूर तालुका खरेदी विक्री संघ यात एकहाती विजय मिळवला होता. त्याचप्रमाणे त्यांनी शिरूर-हवेली विधानसभेसाठी मोठा विजय खेचून आणला आहे. या विजयात जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती सुजाता पवार यांनी तळागाळात जाऊन जोरदार प्रचार केला.

वाघोलीपासून शिरूरपर्यंत भेडसावणारी वाहतूक कोंडी, वाघोलीचा कचऱ्याचा प्रश्‍न, यशवंत साखर कारखाना शंभर दिवसात सुरू न करणे, वाघोलीमध्ये सोसायटीमध्ये रस्ते, पाण्याचा प्रश्‍न, शिरूर हवेलीत निकृष्ट दर्जाची कामे, भाजपामधील जुने कार्यकर्त्यांना विश्‍वासात न घेणे, शिरूर तालुक्‍यातही समाधानकारक विकासकामांकडे दुर्लक्ष, वाळू माफिया, अवैध धंदेवाल्याचा प्रचारात मोठा सहभाग, हेच पाचर्णे यांच्या पराभवाचे मुख्य कारण आहे, अशी चर्चा होत आहे. दरम्यान, शिरूर- हवेली विधानसभा मतदारसंघात आयारामांचे लोण मोठ्या प्रमाणात वाढले होते.

निवडणुकीपूर्वी दोन महिने हा पक्षांतराचा सोहळा विरोधकही याची देही, याचि डोळा असे पाहत होते. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होईल, असे भाकीत राजकीय पंडितांनी व्यक्‍त केले होते. मात्र, अशोक पवार यांची संयमी भूमिका आणि नियोजनबद्ध प्रचारयंत्रणा त्यांना विजयासमीप नेली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.