वाघोली (प्रतिनिधी) : शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांना एका पत्राद्वारे दिल्या गेलेल्या धमकीचा हवेली तालुक्यामधून सर्वपक्षीय निषेध व्यक्त केला जात असून याबाबत लवकरच स्थानिक पातळीवरील पोलीस ठाण्यात निवेदन देऊन याबाबत दोषींवर कडक कारवाईची मागणी कार्यकर्त्यांकडून केली जाणार आहे.
“शिरूर-हवेली चे लोकप्रिय आमदार अशोक पवार यांनी लोकाभिमुख घेतलेल्या निर्णयामुळे त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. आमदार पवार यांना दिलेल्या धमकीचा जाहीर निषेध करण्यात येत असून दोषींवर पोलीस यंत्रणेकडून कडक कारवाई करण्यात यावी.
– राजेंद्र सातव पाटील(नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
“एकमेकांत वैचारिक मतभेद असू शकतात पण विचारांची लढाई विचारांनी लढावी लागते. आमदार पवार यांना लोकांनी निवडून दिले असून एक व्यक्ती म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा समाजात उमटवला आहे. शिवसेना पक्षाच्यावतीने आमदार पवार यांना दिलेल्या धमकी चा जाहीर निषेध करण्यात येत आहे. याबाबतची निषेध सभा देखील लवकरच घेऊन पोलीस यंत्रणेला संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याबाबत निवेदन देण्यात येणार आहे.
– संजय सातव पाटील (नेते, शिवसेना पक्ष)
“पूर्व हवेलीतील सर्वसामान्य जनतेचे पक्षविरहित कामकाज करून प्रश्न सोडवणारा एकमेव नेता म्हणून आमदार अशोक पवार यांच्याकडे पाहिले जाते. आमदार पवार यांची लोकप्रियता ही त्यांना त्यांच्या कामामुळे मिळाली असून. त्यांना जिवे मारण्याची दिलेली धमकी हा अतिशय निंदनीय प्रकार असून याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
– रामभाऊ दाभाडे( माजी जिल्हा परिषद सदस्य, वाघोली)
“शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी शिरूर व हवेली मधील गेल्या वीस वर्षापासून केलेल्या विकास कामांमुळे त्यांचा नावलौकिक राज्यभर पसरला आहे. जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी असामान्य कामगिरी करणारा एकमेव नेता म्हणून त्यांची ओळख आहे. आमदार पवार यांना दिलेल्या धमकी चा राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे.
– शिवदास उबाळे(जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेल)
“आमदार अशोक पवार हे विकासाभिमुख नेता म्हणून सर्वांना परिचित आहे. त्यांनी केलेला विकास कामांना पाठबळ देण्याची गरज आहे. जनतेचा सेवक म्हणून काम करणाऱ्या
आमदार अशोक पवार यांना दिलेल्या धमकीचा काँग्रेस आय पक्षाच्यावतीने जाहीर निषेध करण्यात येत असून संबंधितांची चौकशी करून त्वरित कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
– कमलाकर सातव पाटील(नेते, काँग्रेस आय पक्ष)