दहा उमेदवारांचे भवितव्य शिरूर-हवेलीत मतदानयंत्रात

सरासरी ६७.०२ टक्‍के मतदान

शिरूर – शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघात सरासरी 67.02 टक्के मतदान झाले. किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. एकूण 10 उमेदवारांचे भवितव्य आज यंत्रात बंद झाले असले तरी शिरूर-हवेली विधानसभा मतदार रंगामध्ये विद्यमान आमदार बाबूराव पाचर्णे व माजी आमदार अशोक पवार या दोघांमध्ये दुरंगी लढत आहे.

शिरूर विधानसभा मतदार संघासाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 59 टक्के मतदान झाले होते. यामुळे या निवडणुकीत कोणाचा टक्का वाढला हे मात्र 24 तारखेस समजणार आहे. आज सकाळी शिरूर तालुक्‍यातील सर्वात मतदान केंद्रावर मतदान आज सकाळी सात वाजता सुरुवात झाली. शिरूरच्या लाटेआळी, शाळा नंबर 5 याठिकाणी उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. तर्डोबावाडी, गोलेगाव, न्हावरे, मांडवगण फराटा या ठिकाणी मतदारांनी रांगा लावल्या होत्या. दुपारी दोन वाजेपर्यंत शिरूर विधानसभा मतदारसंघातील शिरूर तालुक्‍यातील तर्डोबावडी, गोलेगाव, निमोणे, लंघेवाडी, करडे, आंबळे, न्हावरे, सरासरी 40 टक्के मतदान झाले होते.

सायंकाळी पाच वाजेपर्यंत 58.81 टक्के मतदान झाले होते, तर मतदानाच्या सहा वाजेपर्यंत सरासरी 67.02 टक्के मतदान झाले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी सांगितले. शिरूर तालुक्‍यात शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव पोलिसांनी तर शिरूरचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तर अनेक ठिकाणी पैसे वाटप असल्याच्या तक्रारी काही राजकीय नेते करत होते त्यामुळे शहरांमध्ये पोलिसांची अनेक ठिकाणी धावाधाव होत होती; परंतु अखेर शिरूर शहरात व शिरूर तालुक्‍यामध्ये शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. गुरुवारी (दि. 24) शिरूर येथील कुकडी वसाहत येथे मतमोजणी होणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.