शिरूर – मानव आणि बिबट यांचा संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालेला दिसुन येत आहे. कवठे, सविंदणे या परिसरात बिबट व तत्सम जंगली हिंस्र प्राण्यांचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी आपले पशुधन टिकवण्यासाठी पराकाष्टा करत आहेत. तसेच या गावातील शेतपिकाचे वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
पशुधनाचे व शेत पिकाचे वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने गावातील काही शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांकडुन पशुधनाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी पशुधनाच्या बंदिस्त गोठ्याला संरक्षण मिळुन बिबट आत मध्ये प्रवेश करू नये म्हणून वन विभागाकडून सविंदणे व कवठे या गावातील भानुदास कांदळकर (कवठे येमाई), संजय नाथू पडवळ (सविंदणे) सखाराम मारुती सरोदे(कवठे येमाई), चंद्रकांत पंढरीनाथ पडवळ (सविंदणे) दिलीप कोंडीबा मुंजाळ (कवठेयेमाई) या शेतकऱ्यांना झटका मशीनचे वाटप करण्यात आले.
या सोलर झटका मशीन मुळे गोठ्यातील पशुधनांचे संरक्षण होणार असून शेतकऱ्यांना आपले पशुधन वाचविण्यास मदत होणार आहे.
वनपरिक्षेत्र वनअधिकारी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल गणेश पवार, वनरक्षक नारायण राठोड, वनमजूर हनुमंत कारकूड यांच्या उपस्थितीत हे वाटप करण्यात आले.
“सोलर झटका मशीन मधील सोलर फेन्सिंगमुळे वन्य प्राण्यांकडून होणारे पशुधनाचे नुकसान मोठ्या प्रमाणात कमी होते. गोठ्याच्या कुंपणावर हे मशीन लावल्यास पाळीव पशुधनाला संरक्षण मिळते. या मशीनची किंमत साधारणता ३०००० रुपये असते. परंतु वन विभागाकडून ते ७५०० एवढ्या किंमतीत शेतकऱ्यांना अनुदानावर दिले जाते.” – गणेश पवार (वनपाल)