शिरूर : शिरूर तालुक्यात नकली सोने विकणारी व नकली सोने बॅकेत ठेवून सोने तारण करणारी टोळी मोठया प्रमाणावर सक्रीय झाली असून पारनेर कनेक्शन असणाऱ्या या टोळीने शिरुर शहरासह शिरूर तालुक्यातील बेट भागात अनेकांना गंडा घातला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
टाकळी हाजी येथील एका सोनाराकडे होलमार्क शिक्का असलेले नकली सोन्याचे कडे देवून आम्हास या बदल्यात दुसरे दागिने बनवायचे आहेत असे सांगून गंडा घालण्याचा प्रयत्न झाला होता.
सोनाराने ते सोन्याचे कडे तपासून पाहिले असता त्यावर होलमार्क शिक्का आढळून आला. परंतु दोन तोळे वजन असलेल्या दागिन्यावर वरून चोवीस कॅरेट सोन्याचे आवरण होते आणि आतमध्ये चांदीची रिंग आढळून आली.
प्रथमदर्शनी हा अलंकार पाहता आणि त्यावरील होलमार्क शिक्का पाहिल्यानंतर तो अलंकार बनावट असेल असे घाईघाई लक्षात येत नाही. त्यामुळे चालू दरापेक्षा कमी दरात सोने मिळत असल्याने अनेकांची फसवणूक झाली असावी.
असा अंदाज सोनार व्यक्त करत आहेत. कांद्याला ,ऊसाला चांगला भाव मिळाल्याने सोने खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. याचा गैरफायदा या टोळीने घेतला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारचे सोने बँकेत तसेच पतसंस्थामध्ये तारण करून पैसे घेतल्याची शंका मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत आहे.
कमी दरात सोने मिळते या अमिषाला बळी न पडता पक्के बिल पाहून सोनाराकडून खात्री करूनच खरेदी करावी. बनावट सोने घेवून फसवणूक झाली असेल तर तातडीने पोलिसांत तक्रार दाखल करावी.
– संदेश केंजळे, पोलीस निरीक्षक, शिरूर