जांबुत : शिरूर तालुक्यातील फाकटे येथील भिल्लवस्तीवर मंगळवारी मध्यरात्री भीषण आग लागून एक कुटुंब उघड्यावर आले आहे. रहिवासी सुनिल सूर्यवंशी यांच्या घराला पावणे एक वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले असून संसारोपयोगी सर्व साहित्य राख झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सुनिल सूर्यवंशी व त्यांची पत्नी रात्री जेवण करून घरासमोरील ओट्यावर झोपले होते. त्याचदरम्यान घराला आग लागल्याची चाहूल लागली. त्यांनी तातडीने आरडाओरडा केल्याने शेजारील नागरिक धावून आले. मात्र तोपर्यंत आगीने विक्राळ रूप धारण केले होते आणि घर पूर्णतः पेटल्याने आग विझवणे अशक्य झाले. दैव बलवत्तर म्हणून दोघेही घराबाहेर झोपले असल्याने त्यांचा थोडक्यात बचाव झाला. “काळ आला होता, पण वेळ आली नव्हती,” अशी भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली. या आगीत घरातील कपडे, गॅस सिलिंडर आणि इतर सर्व संसारोपयोगी वस्तू जळून मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार शरद वारे व पोलीस नाईक शंकर बल्लाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ग्रामसेवक स्वप्नील कवडे यांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.