शिरूर, दि. २९ (अरुणकुमार मोटे) – पोटगीच्या वादातून संतापाच्या भरात पतीने पत्नीवर लोखंडी फायटरने हल्ला केल्याची धक्कादायक घटना शिरूर शहरात घडली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रा विक्रम टोणगे (वय ३२, व्यवसाय – घरकाम, मूळ रा. कोहकडी, जि. अहिल्यानगर; सध्या रा. फाकटे, ता. शिरूर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विक्रम वाल्मीक टोणगे (रा. कोहकडी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दि. २८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास शिरूर हद्दीतील रामलिंग रोडवरील श्री हाइट्स समोर ही घटना घडली. फिर्यादी यांनी पोटगीसाठी न्यायालयात अर्ज दाखल केल्याच्या कारणावरून आरोपी संतप्त झाला. त्यानंतर त्याने फिर्यादीला शिवीगाळ करत दमदाटी केली व जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, आरोपीने हातातील लोखंडी फायटरने फिर्यादीच्या डाव्या कानाच्या वरच्या भागावर वार करून तिला दुखापत केली, असे तक्रारीत नमूद आहे. या घटनेनंतर शिरूर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार जगताप करीत आहेत.