केंदूर (प्रतिनिधी) – शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पिंपळे जगताप येथील उपबाजार केंद्रातील एका कर्मचाऱ्याचा खाजगी अहवाल कोरोना बाधित असल्याचा आल्याने इतर कर्मचाऱ्यांसह संपर्कातील व्यक्तींची देखील चाचणी करण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे.
गेल्या आठवड्यात पिंपळे जगताप उपबाजार केंद्रातील तीन अडतदारांसह एका व्यापाऱ्याने खाजगी लॅबकडून कोरोनाची चाचणी करून घेतली होती. दरम्यान त्या चाचणीत तीनही अडतदारांचा अहवाल कोरोना बाधित आला होता. त्यावेळी परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आणखी दोघांना कोरोनाची बाधा झाली होती.
दरम्यान, अडतदारांसह त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती आता ठणठणीत बरे झाले असताना मात्र आता बाजार समितीच्या एका कर्मचाऱ्याचाच अहवाल कोरोना बाधित आल्याने आणखी भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे पिंपळे जगताप उपबाजार केंद्रातील सर्वच कर्मचाऱ्यांची व कोरोना बाधित कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील सदस्यांची खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाची चाचणी करणार असल्याचे सचिव अनिल ढोकले यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स पाळला जावा, गर्दी कमी व्हावी यासाठी शिरूरच्या मुख्य यार्डमध्ये पहाटे बाजार भरवला जात आहे. परिसरात वेळोवेळी फवारणी केली जात आहे. पिंपळे जगतापच्या उपबाजार केंद्रात कोरोनाचा शिरकाव झाल्याने मानवी वावर होऊ नये म्हणून सध्यातरी हे उपकेंद्र बंदच आहे असे यावेळी सभापती शंकर जांभळकर यांनी सांगितले.
करंदीतही कोरोनाचा शिरकाव
करंदीत (ता. शिरूर) येथील एका पन्नास वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली असल्याने पहिल्यांदाच करंदीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दरम्यान, त्या व्यक्तीचा खासगी अहवाल कोरोना बाधित आल्यानंतर ग्रामपंचायतच्या माध्यमातून घराचा सभोवतालचा परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला आहे. त्याचबरोबर केंदूर आरोग्य केंद्राच्या अधिकारी सारिका तायवडे यांनी भेट देऊन कुटुंबातील २३ सदस्यांना क्वारंटईन होण्याच्या सूचना केल्या आहेत.
दरम्यान, या व्यक्तीच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींनी देखील प्रशासनाला माहिती देऊन स्वतः क्वारंटईन होण्याचे अवाहन ग्रामसेवक दिलीप पानसरे यांनी आवाहन केले आहे.