न्हावरे(प्रतिनिधी) : न्हावरे (ता.शिरूर ) परिसरातील कोकडेवाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे . कोकडेवाडी येथील न्हावरे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य असलेल्या ५२ वर्षीय पुरुषाच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना मांडवगण फराटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, तिथे त्यांच्यावर उपचार चालू असताना त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली. त्यानंतर त्यांची (दि.२२ ) कोरोना तपासणी केली असता, त्यांचा कोरोना तपासणीचा अहवाल पाँझिटिव्ह आला होता. आज(दि.०१) सकाळी मांडवगण फराटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला. शरीरयष्टी अत्यंत दणकट असूनही दुर्दैवाने ते न्हावरे गावातील कोरोनाचे पहिले बळी ठरले आहेत.
न्हावरे गावात आज अखेर एकूण २६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यापैकी १२ जण बरे होऊन घरी परतले आहेत.तर १३ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर एक जणाचा मृत्यू झाला आहे. कोरोना रोगाचे संक्रमण सध्याच्या स्थितीत ग्रामीण भागात वेगाने वाढत आहे.
दरम्यान, कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाकडून देण्यात येत असलेल्या सुचनांचे व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे ग्रामस्थांनी काटेकोरपणे पालन करावे. असे अवाहन ग्रामविकास अधिकारी पी.सी.केदारी यांनी केले आहे.
न्हावरे ग्रामीण रूग्णालयात नव्याने सुरु करण्यात आलेल्या कोविड सेंटरमधून आतापर्यंत कोरोनाच्या व्याधीतून बरे झालेल्या चार रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, कोविड सेंटरमध्ये सद्यस्थितीत १८ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल कराळे यांनी दिली.
दरम्यान, न्हावरे ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये अत्यंत चांगले उपचार व सुविधा देण्यात येत असून येथील सर्व डॉक्टर, परिचारिका, व कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञतेची भावना कोरोनाच्या व्याधीतून मुक्त झालेल्या रुग्णांनी व्यक्त केली आहे.