शिरूर (प्रतिनिधी) : शिरूर तालुक्यातील कारेगाव औद्योगिक वसाहत, अण्णापूर, निमोने, कवठे यमाई या चार गावातील 31 जणांपैकी 29 जणांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे. कवठे यमाई येथील दोन जणांचे अहवाल येणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.
एकूण 31 जणांपैकी 29 जणांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने कारेगाव औद्योगिक वसाहतीतील बड्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तसेच अण्णापूर, निमोने या गावांसह शिरूर तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
शिरूर तालुक्यातील कारेगाव औद्योगिक वसाहतीतील एका बड्या कंपनीत कोरोना संसर्गाने मयत झालेल्या एका कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेले 11 कर्मचारी आणि अण्णापूर येथील 52 वर्ष पुरुषाच्या संपर्कात आलेले 9 जण, मुंबईवरून निमोणे येथे आलेल्या पॉझिटिव्ह नागरिकाचे 2 नातेवाईक तर कवठे येमाई येथील ससून रुग्णालयात कामाला असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेले 7 जण असा एकूण 29 जणांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी सांगितले आहे तर कवठे येमाई येथील आणखी दोघा जणांचे अहवाल येणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.