कोरेगाव भिमा : पुणे जिल्ह्यातील शिरूर हवेली विधानसभेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची समजली जात असताना आज प्रचाराच्या शेवटी महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांनी आपल्या होमपीच वर म्हणजेच वाघोली मध्ये भव्य रॅली काढत शक्ती प्रदर्शन केले तर महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांनी मतदार संघातील गावांत दौरा करत आपल्या प्रचाराचा शेवट केला.
आज सायंकाळी सहा वाजता प्रचाराचा शेवट झाला असून आता बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. शिरूर हवेलीच्या आमदार सोबत महाराष्ट्राच्या सत्तेची चावी कुणाच्या हाती याचा निर्णय 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. नियमानुसार आता प्रचार संपला असून यापुढे दोन दिवस छुपा प्रचार सुरू राहणार आहे.
राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक होत असून शिरूर हवेली मध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शिरूर लोकसभेमध्ये बसलेल्या फटक्यानंतर सावध झालेल्या महायुतीने वेगळी रणनीती आखल्याचं दिसून आलं. तर दुसरीकडे आत्मविश्वास वाढलेल्या महाविकास आघाडीने देखील जोरदार दणक्यात प्रचार केला. आता 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल समोर येणार आहे.
‘या’ दिग्गजांनी शिरूर हवेली गाजवली
चुरशीच्या समजल्या जाणाऱ्या शिरूर हवेलीच्या निवडणुकीत दोन्हीही उमेदवारांनी आपली ताकद वापरत वरिष्ठांच्या सभा घेण्यासाठी जोर लावल्याचे पाहायला मिळाले. महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, निलेश लंके यांच्या तर महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दोन सभा झाल्याने शिरूर हवेलीची निवडणूक दिग्गजांनी गाजवल्याचे पाहायला मिळाले.
‘या’ नेत्यांपुढे गड राखण्याचे आव्हान
पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप कंद व भाजप क्रीडा आघाडी चे अध्यक्ष संदीप भोंडवे यांचा पेरणे वाडे बोल्हाई जिल्हा परिषद गट हा बालेकिल्ला समजला जातो. या गटातील गावांमध्ये या दोघांचे वर्चस्व असल्याचे पाहायला मिळत असले तरी लोकसभा निवडणुकीत लोणीकंद सोडले तर इतर गावांत महाविकास आघाडी चे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांनी आघाडी घेतली होती.
लोकसभा निवडणुकी नंतर विद्यमान आमदार व शिरूर हवेली महाविकास आघाडी चे उमेदवार अशोक पवार यांनी या गटात आपले निष्ठावंत कार्यकर्ते तयार करून प्रचार दौऱ्या दरम्यान या गावांमध्ये आपले वलय असल्याचे दाखवून दिल्याने कंद आणि भोंडवे यांच्या समोर पेरणे वाडे बोल्हाई जिल्हा परिषद गट हा आपला बालेकिल्ला राखण्याचे मोठे आव्हान असल्याचे बोलले जात आहे.