शिरूर/टाकळी हाजी (प्रतिनिधी) : म्हसे बुद्रुक (ता. शिरूर) येथे आठ दिवसांपूर्वी मुंबई कांदिवली येथून आलेल्या कुटुंबापैकी एकाचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली. म्हसे बुद्रुक गाव टाकळी हाजी ग्रामपंचायतीमध्ये येत असल्याने या भागात खळबळ उडाली असून नागरिक भयभीत झाले आहेत.
म्हसे बुद्रुक येथे 12मे रोजी कांदिवली (मुंबई) येथे बॅंकेत काम करणारा एक कर्मचारी आपल्या आठ जणांच्या कुटुंबासह आला होता. म्हसे बुद्रुक येथील गोसावी मळा येथे या सर्वांना टाकळीहाजी प्राथमिक रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी प्रदीप बिक्कड व ग्रामविकास अधिकारी राजेश खराडे यांनी होम क्वारंटाइन करण्यात आले होते. या आठ जणांपैकी चाळीस वर्षे पुरुषाला करोना संसर्गाचे लक्षणे दिसू लागल्याने त्यांना औंध पुणे येथे तपासणीसाठी पाठवले होते. त्या ठिकाणी तपासणी केल्यानंतर आज अहवाल करोना पॉझिटिव्ह आला.
म्हसे बुद्रुक गाव सील करण्यात आले असून या नागरिकांच्या कोणी संपर्कात आलेत का? याची तपासणी टाकळी हाजी प्राथमिक रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी प्रदीप बिक्कड करीत असल्याचे राजेंद्र शिंदे यांनी सांगितले.