क्वारंटाईनपैकी 14 जणांचे करोना अहवाल उद्या दुपारपर्यत येणार…
शिरूर (प्रतिनिधी) : शिरूर सय्यद बाबा नगर येथील 36 वर्षीय कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेले 57 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आली असून तिच्या 14 नातेवाईकांचे कोरोना तपासणी करता नमुने घेतले असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील व शिरूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली आहे.
उद्या दुपारपर्यंत राहणार शिरूर करांची धाकधूक….
शिरूर शहरातील सय्यद बाबा नगर परिसर येथील 36 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली असून या महिलेवर पुणे येथील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहे. या महिलेच्या हाय रिक्स कॉन्टॅक्ट मध्ये आलेले 14 जणांचे आज करोना तपासणी करिता नमुने घेतले असून, तिच्या व तिच्या नातेवाईकांच्या संपर्कात आलेले सय्यद बाबा नगर, बॅकवर्ड हाउसिंग सोसायटी, रेव्हेन्यू कॉलनी ,सैनिक सोसायटी अशा ठिकाणी वरील एकूण 57 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या 14 जणांचे कोरोना तपासणी अहवाल उद्या दुपारपर्यंत येणार असल्याची शक्यता असून सध्या शिरूर शहरात खळबळ उडाली असून उद्यापर्यंत शिरूर करांची धाकधूक कायम राहणार आहे.
शिरूर नगर परिषदेच्या वतीने या भागात सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र म्हणून जाहीर केले असून, या भागातील नागरिकांनी चौदा दिवस कुठेही बाहेर जायचे नसून या भागात सर्व रस्ते बांबू लावून नगर परिषदेच्या वतीने बंद केले आहेत.
शिरूर शहरात असणाऱ्या कोविड केअर सेंटर येथून आज पस्तीस जणांचे कोरोना तपासणीकरिता नमुने पाठवण्यात आले असून त्यात शिरूर येथील 14 तर पाबळ येथील 21 जणांचा समावेश असून, शिरूर तालुक्यातील बाबुराव नगर, गणेगाव खालसा, शिरूर जवळील रामलिंग रांजणगाव गणपती शिक्रापूर व कोरेगाव भीमा येथील दहा कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक तुषार पाटील यांनी सांगितले.