शिरूर (प्रतिनिधी) – शिरूर शहराजवळील बाबुराव नगर व बाफना मळा परिसर सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला असून काल सापडलेल्या बाफना मळा, बाबुराव नगर व बाभुळसर बुद्रुक या करोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 41 जणांना क्वारंटाईन करण्यात आली असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे. क्वारंटाईन केलेल्या मध्ये शिरूर शहरातील एका खाजगी हॉस्पिटल मधील चार जणांचा ही समावेश आहे. त्यामुळे शिरूर शहरात खळबळ उडाली आहे.
शिरूर शहराजवळील तर्डोबावाडी ग्रामपंचायत हद्दीतील बाफना मळा व बाबुराव नगर येथे दोन कोरोना बाधित रुग्ण व बाभुळसर बुद्रुक येथील एक रुग्ण व रांजणगाव गणपती दोन रुग्ण असे एकूण पाच रुग्ण सापडले होते.
बाफना मळा येथील रुग्णाच्या संपर्कात आलेले 14 जण, बाबुराव नगर येथील रुग्णाच्या संपर्कात आलेले 13 जण, बाभुळसर बुद्रुक एक येथील रुग्णाच्या संपर्कात आलेले 14 जण क्वरंटाईन असे एकूण 41 जण क्वारंटाईन करण्यात आले आहे. रांजणगाव गणपती येथील दोन कोरोना बाधितांच्या संपर्क आलेल्या नागरिकांचा शोध घेणे सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
शिरूर तालुक्यात काल एकाच दिवशी चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने शिरूर तालुक्यातील या भागातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी नागरिकांना मास्क वापरणे, सतत हात धुणे, चेहऱ्याला स्पर्श करू नये ,गर्दी करू नये, सोशल डिस्टन्स पाळावे या सूचना दिल्या आहेत.