ओझर : शिरोली बु. (ता. जुन्नर) येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयातील इयत्ता १० वी मधील ८ स्काऊट व ८ गाईड असे एकूण १६ विद्यार्थी भारत स्काऊट गाईड राज्य पुरस्कार चाचणी परीक्षेत उत्तीर्ण झाले असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक प्रसाद हांडे यांनी दिली. या विद्यार्थ्यांनी २ ते ५ जानेवारी व ७ ते १० जानेवारी या कालावधीत राज्य पुरस्कार चाचणी शिबीर भारत स्काऊट गाईड राज्य प्रशिक्षण केंद्र रामबाग (ता. भोर) येथे आयोजित करण्यात आले होते.
या कालावधीत विविध उपक्रम तसेच विविध घटकांचे प्रात्यक्षिक व लेखी चाचणी घेण्यात आली. त्यावेळी विद्यार्थ्यांनी तंबू (टेंट) उभारणी व सजावट, प्रथमोपचार, आपत्ती व्यवस्थापन, वृक्षसंवर्धन, (बागकाम), पाककृती, स्काऊट गाईड ध्वजारोहण अशा विविध उपक्रमात सहभाग घेतला होता. त्यानुसार गुणदान करण्यात आले.
या विद्यार्थ्यांना इयत्ता १० वी परीक्षेत ३ अतिरिक्त गुण मिळणार आहेत. याकरिता विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रसाद हांडे सर, पर्यवेक्षक तथा गाईड कॅप्टन अनघा घोडके, स्काऊट गाईड विभाग प्रमुख रंजना मुंढे, गाईड कॅप्टन प्रियंका पादीर, शोभा कवडे, रुपाली नलावडे स्काऊट मास्टर अक्षय पाटोळे, जनार्दन खेडकर यांनी मार्गदर्शन केले.