राजगुरूनगर – पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. खेडजवळ अज्ञात भरधाव कारने रास्ता ओलांडणाऱ्या १७ महिलांना धडक दिली आहे. या धडकेत पाच महिलांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर, तीन महिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोमवारी रात्री ११ च्या सुमारास हा अपघात झाला आहे. याप्रकरणी खेड पोलीस अज्ञात कारचा शोध घेत आहेत.
दरम्यान अपघातातून बचावलेल्या एका प्रत्यक्षदर्शी महिलेने माध्यमांशी बोलतांना संपूर्ण घटना सांगितली म्हणाली,’आम्ही लग्नातून स्वयंपाकाचे काम उरकून घरी परतत होतो. मध्यरात्र असल्याने अंधार होता. सर्व महिला एकापाठोपाठ एक रस्ता ओलांडत होत्या. त्याचवेळी समोरून एक भरधाव गाडी आली काही कळण्याच्या आतच ती महिलांना उडवत उडवत गेली. आम्ही बायकांना मागे ओढत होतो. असेही या महिलेने सांगितले.
ती महिला पुढे म्हणाली,’अपघातानंतर आमच्या साथीदार महिला रस्त्यावर पडल्या होत्या आम्ही जोरजोरात रडत होतो. मदत मिळावी यासाठी ओरडत होतो. १० ते २० मिनिटं आम्हाला मदत मिळाली नाही. थोड्या वेळानंतर आम्हाला मदत मिळाली.’
दरम्यान,पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर राजगुरुनगर जवळच्या शिरोली, (ता. खेड) परिसरात खरपुडी फाट्यावर सोमवारी (दि.१३) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास चार चाकी गाडीने महामार्ग ओलांडणाऱ्या १७ महिलांना धडक दिली. या अपघातात ५ महिलांचा मृत्यू झाला आहे तर तीन अत्यवस्थ आहेत. उरवरीत ९ महीला सुखरूप आहेत.
पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर उतारावर शिरोली गावाच्या हद्दीत खरपुडी फाट्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. या बाजूकडे मंगलकार्यालये असल्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते त्यामुळे रस्ता ओलांडताना अपघात होत आहेत.राष्ट्रीय महामार्ग असल्याने व तीव्र उत्तर असल्याने मोठे अपघात झाले आहे. ते रोखण्यासाठी महामार्गावर गतिरोधक व सर्व्हिस रस्ता होणे गरजेचे आहे. अशी मागणी स्थनिक ग्रामस्थांनी केली आहे.