शिर्डी : जगभरातील करोनाच्या वाढत्या रुगसंख्येच्या पार्श्वभूमीवर देशात खबरदारीचे उपाय राबवले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील साईबाबा संस्थान सुद्धा सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे. संस्थानाकडून करोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी येताना भाविकांनी मास्क वापरावे तसेच कोविडच्या बूस्टर डोसचे लसीकरण सुद्धा करुन घ्यावे, असे आवाहन साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी केलं आहे. करोनाच्या नवीन व्हेरियंटचा भारतातील शिरकाव ही बाब लक्षात घेऊन मंदिर प्रशासन अलर्ट झाले असून भाविकांना काळजी घेण्यास सांगितले जात आहे.
शिर्डीत येणाऱ्या भाविकांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, सॅनिटायझरचा वापर करावा जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग होणार नाही. त्यासोबतच ज्यांनी कोविडचा बूस्टर डोस घेतलेला नाही, त्यांनी तो घ्यावा,” असे राहुल जाधव यांनी म्हटले आहे.
शिर्डीला दररोज हजारो तर सुट्टीच्या काळात लाखो भाविक हजेरी लावत असतात. येणारी नाताळाची सुट्टी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणारी गर्दी लक्षात घेता साईबाबा संस्थानच्या वतीने मास्क लावण्याचं आणि बुस्टर डोस घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.