राहाता –शिर्डी विधानसभा निवडणुकीसाठी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे आज दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. तसेच अल्ताफ इब्राहिम शेख यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उद्या (दि.4) अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ना. विखे पाटील शक्तिप्रदर्शन करुन अर्ज दाखल करणार आहेत.
अद्याप कॉंग्रेस पक्षाने एकही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. ना. विखे पाटील यांच्यावतीने माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांच्या समवेत शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते, गणेश सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद सदाफळ, भाजपचे तालुकाध्यक्ष नंदकुमार जेजूरकर, ऍड. रघुनाथ बोठे, ऍड. नारायण कार्ले, मौलाना अजगर अली, माजी नगराध्यक्षा संगीता निकाळे, संजय सोमवंशी, दशरथ तुपे, किरण वाबळे आदी उपस्थित होते. उद्या तालुक्यातील सर्वच गावांमधून विखे यांचे समर्थक मोटारसायकल रॅली काढून राहाता येथे वीरभद्र मंदिरासमोर जमणार आहेत. त्या ठिकाणाहून ना. विखे पाटील यांच्या समवेत रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानंतर राहाता वीरभद्र मंदिरासमोर प्रचारसभा होणार आहे.