बाळासाहेब सोनवणे
राहाता – शिर्डी लोकसभा मतदारसंघात सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण शांतच आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल व त्यानंतर कार्यकर्ते कामाला लागतील. तसेच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
शिवसेना-भाजप युतीकडून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी आघाडीने श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून या निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवली आहे. सध्यातरी हे तीन उमेदवार शिर्डी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. परंतु खरे चित्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी स्पष्ट होईल. जिल्ह्यामध्ये दक्षिणेत लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची धुमाळी जोरात सुरू आहे. परंतु अद्याप शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराच्या आघाडीवर शांतता दिसून येत आहे.
ना. विखे पाटील काय भूमिका घेतील, याकडे सध्या लक्ष लागून आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार व शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे, कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे व अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे या तीनही उमेदवारांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे असे असले, तरी अजून निवडणुकीत चुरस निर्माण झाली नाही. ना. विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी दक्षिणेतून भाजप पक्षाकडून उमेदवार अर्ज दाखल केल्यामुळे उत्तरेत कॉंग्रेस कार्यकर्त्यांची परिस्थिती तळ्यात मळ्यात झाली आहे. ना. त्यामुळे विखे पाटील काय भूमिका घेतील, त्यानंतर खऱ्या अर्थाने तालुक्यातील प्रचारात रंगत येईल.