सांगली : (प्रतिनिधी) शिराळा तालुक्यातील निगडी येथील कोरोनाबाधित तरूणीच्या संपर्कातील 12 जणांपैकी तिच्या आईचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आसून इतर 11 जण निगेटिव्ह आले आहेत. तसेच वाळवा तालुक्यातील कामेरी आणि कासेगाव या दोन गावांतील दोघांना कोरोनाची लागण झाली. शनिवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ते दोघेही कराड येथील कृष्णा हॉस्पिटल येथे कर्मचारी आहेत. त्यांच्यावर तेथेच उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, निगडी येथील कोरोनाग्रस्त तरुणीच्या भावाचा मात्र अहवाल निगेटिव्ह आला आहे.
कामेरी आणि कासेगाव येथील दोघांना करोनाची लागण झाल्याने वाळवा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. करोनाबाधित दोघेही कृष्णा हॉस्पिटलमध्ये कर्मचारी असून त्यांच्यावर तेथेच उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, संबंधित करोनाबाधितांच्या संपर्कात आणखी कोण आले होते का, याचा शोध प्रशासन घेत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने गाव सील केले आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या कामेरी येथील 15 आणि कासेगाव येथील 9 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.