टोकियो – जपानच्या दक्षिणेकडील बेटाजवळ जनावरांची वाहतूक करणारे एक जहाज खवळलेल्या समुद्रामुळे आज बुडाले. जपानच्या बचाव पथकाकडून या जहाजातील 42 खलाशांचा शोध सुरू असल्याचे तट रक्षक दलाने सांगितले.
जपानच्या नौदलाच्या पी-3 सी या टेहळणी करणाऱ्या विमानाने दुर्घटनाग्रस्त ‘द फिलीपिनो’ या जहाजावरील एका खलाशाला बघितले आणि त्याला वाचवले. जीवरक्षक जॅकेट घातलेला हा खलाशी विमानाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होता. हे जहाज बुडण्याआधी दुर्घटनाग्रस्त झाले होते, असे या खलाशाने बचाव पथकाला सांगितले. जपानच्या नौदलाचे प्रवक्ते युचिरो हिगाशी यांनी जपानच्या नौदलाच्या तटरक्षक दलाच्या प्रादेशिक मुख्यालयावर ही माहिती दिली.
या जहाजावर आखातातील 11,947 टन पशुधन होते. त्यामध्ये 5,800 गायीही होत्या. हे पशुधन पूर्व चीनच्या समुद्राच्या पश्चिमेकडील अमामी ओश्मा जवळ नेल्या जात असताना हे जहाज दुर्घटनाग्रस्त झाले आणि मदतीचे आवाहन करणारा संदेशही पाठवला गेला होता.
हे जहाज नेमक्या कोणत्या संकटात सापडले होते, हे समजू शकलेले नाही. मात्र मायसक या वादळामुळे समुद्र खवळलेला होता. हे वादळ निघून गेल्यावर शोध आणि बचाव कार्याला सुरुवात होऊ शकली, असे हिगाशी यांनी सांगितले.
हे जहाज संयुक्त अरब अमिरातीमधील गल्फ नेव्हिगेशन होल्डींग कंपनीच्या मालकीचे होते. ईशान्य न्यूझिलंडमधील नेपियर बंदरातून ऑगस्ट महिन्याच्या मध्यात निघाले आणि चीनच्या पूर्वीकडील किनाऱ्यावरील तांग्शान बंदराकडे निघाले होते.