चमचमता हिरा : एल अँड टी इन्फोटेक

नव्या तंत्रज्ञान क्षेत्रात भरीव कामगिरी...

सुहास यादव ([email protected])

लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक लिमिटेड (एलटीआय) कंपनीच्या मोझॅक प्लॅटफॉर्मद्वारे मोबाइल, सोशल, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि क्‍लाऊड जर्नीच्या क्षेत्रात क्‍लायंटस्‌चे काम अधिक वेगाने कसे होईल, यादृष्टीने डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन क्षेत्रात कंपनी काम करत आहे. आधुनिक काळात हे तंत्रज्ञान अधिक विकसित होणार असल्यामुळे कंपनीने यावर भर दिला आहे. त्यासाठी आवश्‍यक ते कुशल मनुष्यबळ कंपनी विकसित करीत आहे. आज आयबीएम, मायक्रोसॉफ्ट, सॅप, मायक्रो फोकस, ओरॅकल अशा काही कंपन्यांशी एलटीआयचा स्ट्रॅटेजिक अलायन्स आहे. आगामी काळात कंपनीची जागतिक पातळीवर वाटचाल जारी राहणार आहे.

कंपनीची ओळख

एल अँड टी इन्फोटेक (एलटीआय) ही प्रसिद्ध अशा लार्सन अँड टुब्रो समूहातील आयटी क्षेत्रातील कंपनी आहे. एकत्र येत असलेल्या जगात आज ग्लोबल टेक्‍नॉलॉजी आणि डिजिटल सोल्युशनच्या क्षेत्रात काम करणारी ही कंपनी जगभरातील 32 देशांमधील सव्वाचारशेहून अधिक क्‍लायंटस्‌ सोबत सक्रिय आहे. जागतिक उद्योगविश्‍वाशी दीर्घकाळ नाते जोडले गेलेल्या एल अँड टी समूहाचा एलटीआयला मोठा वारसा लाभलेला आहे. 21 अब्ज डॉलरची उलाढाल असलेला एल अँड टी समूहाकडे तब्बल 80 वर्षांचा व्यावसायिक आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील अनुभव आहे. अशा या एल अँड टी समूहातील उपकंपनी म्हणून एलटीआयची 1997 मध्ये स्थापना झाली. सुरुवातीला कंपनीचे नाव एल अँड टी इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी लिमिटेड असे होते. 2001 मध्ये ते बदलून लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक लिमिटेड असे करण्यात आले.

एलटीआय कंपनीच्या मोझॅक प्लॅटफॉर्मद्वारे मोबाइल, सोशल, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि क्‍लाऊड जर्नीच्या क्षेत्रात क्‍लायंटसचे काम अधिक वेगाने कसे होईल यादृष्टीने डिजिटल ट्रान्स-
फॉर्मेशन क्षेत्रात कंपनी काम करत आहे. लार्सन अँड टुब्रो समूहातील आयटी कंपनी म्हणून वीस वर्षांपूर्वी एल अँड टी इन्फोटेकचा प्रवास सुरू झाला.

उद्योगांच्या सर्व क्षेत्रांतील गुंतागुंतीच्या आव्हानांवर मात करण्याची क्षमता असलेले तज्ज्ञांचे कुशल बळ कंपनीकडे आहे. क्‍लायंटच्या व्यवसायातील प्रभाव आणि परिणामकारकता वाढावी यासाठी कंपनीच्या सुमारे तीस हजारांहून जास्त तज्ज्ञांची टीम रोज काम करत असते. एल अँड टी समूहाची अनेक वर्षे यशस्वीपणे धुरा सांभाळणाऱ्या ए. एम. नाईक यांच्या रूपाने कंपनीला अनुभवी नेतृत्व लाभले आहे. ते कंपनीचे नॉन-एक्‍झिक्‍युटिव्ह चेअरमन म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

आज आयबीएम, मायक्रोसॉफ्ट, सॅप, मायक्रो फोकस, ओरॅकल अशा काही कंपन्यांशी एलटीआयची स्ट्रॅटेजिक अलायन्स आहे. आज कंपनीचे जगभर सव्वाचारशेहून अधिक क्‍लायंटस्‌ आहेत. त्यापैकी 67 फॉर्च्युन 500 कंपन्यांमधील आहेत. जगभरातील आयटी क्षेत्रांतील वीस आघाडीच्या कंपन्यांमध्ये एलटीआयचा समावेश होतो.

अमेरिकेतील 30 ठिकाणांसह कंपनीची 59 सेल्स ऑफिसेस आहेत. जून 2020 रोजी संपलेल्या बारा महिन्यांत 1.56 अब्ज डॉलर एवढी कंपनीची उलाढाल आहे. एलटीआयची आज बॅंकिंग आणि वित्त संस्था, विमा, तेल आणि वायू, पॅकेज्ड गुडस्‌ अँड रिटेल, फार्मा, हेल्थकेअर, मीडिया अँड एन्टरटेन्मेंट, ऑटोमोटिव्ह अँड एरोस्पेस, इंजिनियरिंग अँड कन्स्ट्रक्‍शन अशा क्षेत्रात आयटीविषयक कामे चालू आहेत.

सुरुवातीच्या काळात कंपनीने टेलिकॉम कंपन्यांसाठी सर्वसमावेशक बिलिंग सोल्युशन्स, बिलिंग इंजिन यावर कंपनीने काम केले. त्याचबरोबर फ्रॉड मॅनेजमेंट कंट्रोल सेंटर्स विकसित करण्याची क्षमता प्राप्त केली. 2004-05 मध्ये कंपनीने निर्यातीतून मिळणाऱ्या महसुलात लक्षणीय वाढ मिळवली. 2006-07 मध्ये कंपनीने अमेरिकेतील जीडीए टेक्‍नॉलॉजीज ही कंपनी दोन कोटी 70 लाख डॉलरला घेतली. त्याच वर्षात कंपनीने निवडलेल्या बॅंकिंग, वित्तसेवा, विमा, ऊर्जा आणि पेट्रोकेमिकल्स प्रॉडक्‍ट इंजिनियरिंग या निवडलेल्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले. 2007-08 मध्ये कंपनीने नवी मुंबई आणि बेंगळुरूमध्ये दोन नवी डेव्हलपमेंट सेंटर सुरू केली.

2008-09 मध्ये कंपनीने पूर्णपणे आयटी सेवा पुरवणारी कंपनी म्हणून कन्सल्टिंग सर्व्हिस आणि टेस्टिंग सर्व्हिस लाईन सुरू केली. 2011 मध्ये कॅनडातील सिटीग्रुप फंड सर्व्हिसेसचे ट्रान्सफर एजन्सी बिझनेस युनिट ताब्यात घेतले आणि त्याचे नामकरण एल अँड टी इन्फोटेक फायनान्शियल सर्व्हिसेस टेक्‍नॉलॉजीज असे केले. नंतरच्या काळात कंपनीने अऩेक छोट्या कंपन्यांना सामावून घेत वाटचाल सुरू ठेवली. जुलै 2016 मध्ये कंपनीने शेअरबाजारात पदार्पण केले. त्यावेळी किरकोळ गुंतवणूकदारांना कंपनीचे समभाग 700 रुपयांना मिळाले. आज चार वर्षांनी कंपनीच्या समभागाचा भाव 3000 रुपयांवर आहे.

पुढील काळात तंत्रज्ञानाधारित काम करणाऱ्या कंपन्या, आयटी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांचे भवितव्य लक्षात घेता एलटीआयचे भवितव्य उज्ज्वल दिसते.
(एल अँड टी इन्फोटेक – शुक्रवारचा (एनएसई) बंद भाव – 3075.15 रु.)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.