गुवाहाटी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भावनिक आवाहन केल्यानंतर बंडखोर आमदारंचे नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांना उद्देशून एक सवाल केला. एकीकडे तुमचे पुत्र आणि शिवसेनेचे प्रवक्ते आमच्या विषयी आक्षेपार्ह भाषा वापरत आहेत. तर दुसरीकडे तुम्ही समेटाची भाषा करत आहात, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले. तसेच, याचा अर्थ काय, असा प्रश्नही विचारला.
ठाकरे यांचे मंत्रिपुत्र आदित्य आणि शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांविरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. ते बंडखोरांवर टीका करताना शेलक्या शब्दांचा वापर करत आहेत. त्याविषयी बंडखोर शिंदे गटाकडून वारंवार नाराजी व्यक्त केली जात आहे. अशात ठाकरे यांनी बंडखोरांना पुन्हा भावनिक साद घातली.
त्यानंतर शिंदे यांनी ट्विटरवरून ठाकरे यांना प्रतिसाद दिला. एका बाजूला तुमचे पुत्र आणि प्रवक्ते वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना जनावरांची उपमा देत आहेत. त्यांचा मृतदेह म्हणून उल्लेख करत आहेत. त्यांचा बाप काढत आहेत. तर दुसऱ्या बाजूला हिंदूविरोधी महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी त्याच आमदारांना समेटाची हाक दिली जात आहे, अशा आशयाची टिप्पणी शिंदे यांनी केली.
त्यातून त्यांनी बंडखोर आमदारांविषयी शिवसेना दुतोंडी भूमिका घेत असल्याचे सूचित केले. त्यामुळे आक्षेपार्ह टीका करणाऱ्यांना आवर घालावा असा संदेशही बंडखोरांनी ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवल्याचे मानले जात आहे.