शिंदे v/s महास्वामी यांच्यात लढतीची शक्यता


विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचा पत्ता कट ?

– सूर्यकांत आसबे

सोलापूर – सोलापूर लोकसभेसाठी कॉंग्रेस पक्षाकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता भाजपचे विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचा पत्ता कट झाला असून त्यांच्या ऐवजी सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून गौडगाव मठाचे डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या नावावर एकमत झाले आहे. सोलापूर लोकसभेबाबत नुकतीच मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीला जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना बोलावून घेण्यात आले होते. पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्धा तास चर्चा केल्यानंतर महास्वामी यांच्याशीसुद्धा चर्चा झाल्यानंतर फडणवीस यांनी कामाला लागण्याचे फर्मान महास्वामी यांना सोडले असल्याचे समजते.

विद्यमान खासदार बनसोडे यांच्याबाबत जनतेत कमालीची नाराजी होती. त्यांच्याऐवजी राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांना गेल्या काही दिवसांपासून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी फ्लॅश करण्यास सुरुवात केली होती. साबळे यांनीसुद्धा लोकसभेच्यादृष्टीने कामाला सुरुवात केली होती. परंतु सहकारमंत्री देशमुखांच्या या इच्छुक उमेदवाराला पालकमंत्री देशमुखांचा विरोध होताच. त्यामुळे अनेक दिवस उमेदवार कोण यावर खलबते होत होती. तर खासदार बनसोडे मात्र आपणच उमेदवार असल्याचे सांगत होते. मात्र मंगळवारच्या बैठकीनंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. महास्वामींच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असले तरी आता केवळ घोषणेची औपचारिकता बाकी राहिली आहे.

दरम्यान दोनच दिवसांपूर्वी मैंदर्गीचे नीलकंठ शिवाचार्य महास्वामींच्या पुढाकाराने या भागातील महस्वामीजींची बैठक झाली होती . या बैठकीत जयसिद्धेश्वर महास्वामींना संपूर्ण मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची चर्चासुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत करण्यात आली . महास्वामी सोलापुरात परतल्यानंतर त्यांनी मठाधीशांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. मठाधीशांच्या निर्णयानंतर उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार असल्याचे बोलले जात आहे.

पालकमंत्री विजयकुमार देशमुखांच्या शहर उत्तर तर दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तसेच मंगळवेढा तालुक्‍यात लिंगायत समाजाचा टक्का हा महत्त्वपूर्ण आहे. महास्वामींना मानणारे व शब्द झेलणारे अनेक रथी महारथी येथे आहेत.त्यांची व लिंगायत समाजाची मते ही निर्णायक ठरत असतात.आणि हे सर्व राजकारणी जाणून आहेत. शिवाय भाजप आणि शिवसेनेची झालेली युती यामुळेच नवा चेहरा म्हणून महास्वामींना पुढे आणण्यात आले आहे.

माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या तगड्या उमेदवारास टक्कर देण्यासाठी महास्वामीच योग्य ठरू शकतात, याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सहकारमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर महास्वामींच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. कॉंग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचा प्रचार करताना अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे महास्वामींच्याबाबत कोणती भूमिका घेणार याबाबत अक्कलकोटकरांमध्ये विशेष उत्सुकता लागून राहिली आहे. तर शिंदे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू म्हणून ओळखले जाणारे धर्मराज काडादी यांची भूमिकासुद्धा महत्वाची ठरणार आहे.

लिंगायत समाजामध्ये महास्वामींना मानणारा मोठा वर्ग आहे. बहुतांश लिंगायत समाजाचे राजकारण हे मठामधूनच चकळते चालते आणि त्यात घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात जाण्याचे धाडस सहसा कोणी दाखवत नाही. लिंगायत समाजामध्ये भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षाला मानणारे आहेत. यापूर्वी माजी आमदार विश्वनाथ चाकोते हे शहर उत्तर मतदार संघातून आमदार झाले आहेत. तर अक्कलकोट मतदार संघातून सिद्धाराम म्हेत्रे निवडून येत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत लिंगायत समाजावर उमेदवारांच्या विजयाचे गणित अवलंबून असणार आहे. त्यातच मुस्लिम समाजाची मतेसुद्धा निर्णायक असल्याने शिंदे आणि महास्वामी यांना निवडून येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उमेदवारीवर आज जरी शिक्कामोर्तब झाले असले तरी त्यांनी गेल्या दोन महिन्यांपासूनच प्रचाराच्या अनुषंगाने मतदार संघातील मान्यवरांच्या गाठीभेटींवर भर देण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. जुन्या मंडळींना भेटून चर्चा करण्याबरोबरच छोटया – मोठ्या कार्यक्रमांना हजेरी यावरूनच शिंदे यांच्या प्रचाराची चुणूक दिसून येत आहे. भाजपकडून महास्वामींच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याच्या शक्‍यतेने कॉंग्रेस पक्षातील लिंगायत समाजाच्या आजीमाजी आमदार आणि नेत्यांची मात्र गोची होऊन बसली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)