सातारा – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपदासाठी गुरुवारी नाव जाहीर होतात शिंदे समर्थकांनी साताऱ्यातील पोवई नाक्यावर सायंकाळी एकच जल्लोष केला. “जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा देत शिंदे समर्थकांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची बांधणी यापुढेही सुरू राहील, असा विश्वास सातारा शिवसेना शहरप्रमुख निलेश मोरे यांनी व्यक्त केला.
भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली. आणि शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर होतात त्यांच्या साताऱ्यातील समर्थकांनी एकच जल्लोष केला. शिंदे यांचे साताऱ्यातील कट्टर समर्थक शिवसेनेचे शहरप्रमुख निलेश मोरे यांनी या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत पोवई नाक्यावर आपल्या कार्यकर्त्यांसह पेढे वाटले. तसेच पोवई नाक्यावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून “जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा देण्यात आल्या. शिवसेनेतील त्यांच्या कार्यालयात प्रतिक्रिया देताना निलेश मोरे म्हणाले “एकनाथ शिंदे शिवसेनेचेच असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे कामकाज यापुढेही सुरूच राहणार आहे. जिल्ह्याच्या व शहराच्या विकास कामासंदर्भात आणि पक्षबांधणीसंदर्भात यापुढेही आमचे काम सातत्याने सुरू राहणार आहे.’ एकनाथ शिंदे उर्फ भाई कामाचा जो शब्द देतात तो खरा करून दाखवतात. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील समस्यांना आता निश्चितच न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
साखर वाटून व्यक्त केला दरे ग्रामस्थांनी आनंद
महाराष्ट्रात सत्ता पालट करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या रूपाने गेल्या 62 वर्षाच्या वाटचालीत सातारा जिल्ह्याला चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाचे गिफ्ट मिळाले आहे. मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यामुळे सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातही आनंदीआनंद झाला आहे. नगर विकास खाते सांभाळताना जिल्ह्याच्या निधी वितरणामध्ये कधी त्यांनी हात आखडता घेतला नाही. एकनाथ शिंदे यांच्याच नावाची मुख्यमंत्री पदासाठी घोषणा झाल्याने सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळामध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. शिंदे मुख्यमंत्री झाल्याचे समजताच दरे गावात ग्रामस्थांनी साखर वाटून आनंद व्यक्त केला.