शिंदे, पवार यांच्या खर्चात आढळली तफावत

जामखेड  – कर्जत-जामखेड मतदारसंघातील उमेदवारांनी 12 ऑक्‍टोबरपर्यंत केलेल्या निवडणूक खर्चाच्या तपासणीचे काम पूर्ण झाले आहे. यामध्ये बारापैकी भाजपचे उमेदवार राम शिंदे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांच्या खर्च तपासणीत त्रुटी आढळल्याने त्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. तसेच नोटीस मिळाल्यानंतर 48 तासांच्या आत खुलासा सादर करण्याचे निर्देश निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्‍टोबरला मतदान होणार आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातून 12 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा 28 लाख रुपयांपर्यंत असून, उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या दिवसापासून दैनंदिन निवडणूक खर्च उमेदवाराने सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार उमेदवारांनी सादर केलेल्या निवडणूक खर्चाची द्वितीय तपासणी सोमवारी (दि. 14) करण्यात आली आहे.

यामध्ये उमेदवारांनी 12 ऑक्‍टोबरपर्यंत केलेल्या खर्चाची तपासणी करण्यात आली. महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांनी सादर केलेल्या खर्चामध्ये तीन लाख 60 हजार 23 रुपये दाखवला असून, निवडणूक आयोगाच्या परिगणित खर्चामध्ये सात लाख 53 हजार 742 रुपये खर्च झाला आहे. त्यामुळे शिंदे यांच्या खर्चामध्ये तीन लाख 82 हजार 579 रुपयांची तफावत आढळली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांनी सादर केलेल्या खर्चामध्ये पाच लाख पाच हजार 739 रक्कम दाखविण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाच्या परिगणित खर्चामध्ये आठ लाख 40 हजार 53 रुपये खर्च झाल्याचे दिसते. पवार यांच्या खर्चामध्ये तीन लाख 34 हजार 264 रुपयांची तफावत आढळली आहे. या उमेदवारांना नोटिसा देऊन योग्य त्या पुराव्यासह 48 तासांच्या आत खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तिसरी तपासणी आता 18 ऑक्‍टोबरला करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.