नवी दिल्ली – मराठी भाषेत सुशीलकुमार शिंदे यांच्या “शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ या काव्यसंग्रहाला यंदाचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार, तर “जंगल खजिन्याचा शोध’ या सलीम मुल्ला यांच्या कादंबरीस बालसाहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. साहित्य अकादमीकडून 22 जणांना बाल पुरस्कार, तर 23 जणांना युवा साहित्य अकादमी पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली.
हे पुरस्कार साहित्य अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर कांब्रा यांनी जाहीर केले आहेत. बाल पुरस्काराचे वितरण बाल दिनी वितरीत करण्यात येणार आहेत. मात्र, युवा पुरस्कार वितरणाची तारीख निश्चित करण्यात आलेले नाही. पुरस्कार विजेत्यांना सन्मान चिन्ह आणि 50 हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे.
साहित्य अकादमीचे पुरस्कार 1955 पासून दरवर्षी भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्यकृतींना दिले जातात. यात अनुवाद, युवा आणि बालसाहित्य पुरस्कारांचा समावेश आहे. एकूण 24 भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. यंदा 23 भाषांतील साहित्यासाठी पुरस्कार जाहीर झाले असून मैथिली भाषेतील पुरस्कार जाहीर व्हायचा आहे.
साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणारा बालसाहित्य पुरस्कार तळंदगे (ता. हातकणंगले) येथील सलीम सरदार मुल्ला यांच्या “जंगल खजिन्याच्या शोधात’ या बाल कादंबरीस जाहीर झाला आहे. या कादंबरीत मुल्ला यांनी अतिषय उत्कंठावर्धक कथा गुंफली आहे. जंगलातील मौल्यवान औषधी वनस्पतींची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करणाऱ्या बालचमूचे चित्रण या कादंबरीत केले आहे. मुल्ला यांनी वनविभागात वनसंरक्षक म्हणून प्रदीर्घ काळ सेवा केली आहे. यादरम्यान त्यांनी केलेली निरीक्षणे या कादंबरीच्या रुपाने अगदी प्रभावी मांडली आहेत.