मुंबई – शिवसेनेत शिंदे आणि ठाकरे गट पडल्यापासून खासदार संजय राऊत हे शिंदे गटाला डिवचण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने सत्ता संघर्षांचा निवाडा करण्यासाठी ते प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवल्यापासून राऊत हे अधिक आक्रमतेने ठाकरे गटासह भाजपवर टीका करताना दिसून येतात. नुकतंच राऊत यांनी ‘शिंदे गट म्हणजे भाजपने पाळलेला कोंबड्यांचा खुराडा’ असल्याचे म्हणत जोरदार टीका केली.
माध्यमांशी बोलताना राऊत यांनी पुन्हा एकदा मिंधे गट असा उल्लेख करत जोरदार निशाणा साधला. मी शिंदे आणि त्यांच्यासह गेलेल्या चाळीस लोकांना पक्ष मानतच नाही असा टोला देखील यावेळी संजय राऊत यांनी लगावला. शिंदे गट लोकसभेच्या २२ जागा लढवणार असल्याची चर्चा आहे असं विचारलं असता संजय राऊत यांनी कडाडून टीका केली.
संजय राऊत म्हणले,”मूळात तुम्ही जो काय शिंदे-मिंधे गट म्हणत आहात त्यांच्याकडे मी पक्ष म्हणून पाहातच नाही. भाजपाने पाळलेला कोंबड्यांचा तो खुराडा आहे. गावाला कोंबड्यांचे खुराडे असतात, कधीही कुठल्याही कोंबड्या कापल्या जातील. तो पक्ष नाहीच, कोंबड्या कॉक कॉक आरवत असतात. तसं ते करताहेत” अशी टीका राऊतांनी यावेळी केली.
पुढे बोलताना राऊत म्हणाले,”पक्ष म्हणून त्यांच्याकडे काय आहे ? काय विचारधारा आहे ? फक्त निवडणूक आयोगाने निर्णय विकत दिला म्हणजे पक्ष ठरत नाही. त्या टोळीने ४८ जागा लढवाव्यात आम्हाला काही फरक पडत नाही” अशा शब्दात राऊत यांनी शाब्दिक हल्ला चढवला.