मुंबई – शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना सरकारकडून मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. पेट्रोल ५ तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने जाहीर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पत्रकार परिषद घेत हा निर्णय जाहीर केला.
शिंदे-फडणवीस सरकारने घेतले महत्वाचे निर्णय
पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय
राज्यात “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान” राबविण्यात येणार.
केंद्र पुरस्कृत अमृत अभियान २.० (Atal Mission For Rejuvenation & Urban Transformation) राज्यात राबविणार
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेणार
राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची थेट निवडणूक घेणार. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा. अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढविणार
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६९ मधील कलम ४३ मध्ये सुधारणा.
बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार.महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा.
आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान यथोचित गौरव करण्याची योजना पुन्हा सुरु करणार
यातील बरेचसे निर्णय २०१४ मध्ये भाजप सरकार राज्यात आल्यानंतर घेण्यात आलेले होते. मात्र महाविकास आघाडी सरकारने यातील काही निर्णयांना स्थगिती दिल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता राज्यात पुन्हा भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारने महत्वाचे निर्णय घेतल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे पेट्रोल डिझेलचे दर कमी केल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.