शिरूर – येथील साहिल बांदल याने लोणावळालगत असलेला सुमारे 250 फूट उंचीचा अवघड मानला जाणारा तैलबैला हा सुळका राईट फ्रंट या अवघड बाजूने विक्रमी वेळेत सर केला. या मोहिमेमध्ये साहिल याच्यासमवेत मुंबई, हरियाणा व गुजरातचे 4 गिर्यारोहक होते. तैलबैला हा सुळका पुणे जिल्ह्यातील लोणावळाजवळील तैलबैला गावाजवळ आहे.
तैलबैला हा प्रस्थारोहणाच्यादृष्टीने अत्यंत अवघड मानला जातो. हा सुळका सर करण्यासाठी प्रस्थारोहणाचे चार मार्ग असून त्यापैकी समोरील बाजूची चढाई अत्यंत अवघड आहे. साहिल व त्याच्या टीमने ही अवघड बाजूची चढाई विक्रमी वेळेत पूर्ण करून माथ्यावर तिरंगा फडकवला. मोहिमेत मुंबई येथील मॅक मोहन यांनी लीड क्लाइंबिंग केले. गुजरात येथील संविद पांचाल व हरियाणा येथील वरूण मेहता यांनी बीलेयरचे काम केले. मुंबई येथील डॉ. विनीत गाडा यांनी एन्ड मॅन क्लायंबरचे काम केले. साहिल हा गिर्यारोहण क्षेत्रात कामगिरी करीत आहे. त्याने नुकतेच आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट किलीमांजारो सर केले आहे.
या शिखरावर सर्वात मोठ्या लांबीचा तिरंगा फडकवण्याचा विश्वविक्रम साहिलने प्रस्थापित केला आहे. साहिलने बेसिक व ऍडव्हान्स मौन्टीनीरिंग, बेसिक रॉक क्लाइंबिंग हे कोर्स “अ’ श्रेणीसह पूर्ण केले आहेत. यापुढेही अनेक मोहिमांचे नियोजन केले असून युरोप खंडातील सर्वोच्च शिखर “माऊंट एलब्रूस’ सर करणार असल्याचे साहिलने सांगितले.