शिक्रापूर ग्रामविकास आघाडीची ढोल ताशाच्या गजरात रॅली

करंजे नगर कॉलनीतून तीनही उमेदवारांवर फुलांचा वर्षाव

शिक्रापूर (वार्ताहर) – शिक्रापूर येथे ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार आज थंडावत असताना उमेदवारांनी आपल्या शेवटच्या भेटी घेत अनेक आश्‍वासने दिली आहेत. शिक्रापूर ग्रामविकास आघाडी पॅनलची वॉर्ड क्रमांक एकमधून ढोल ताशाच्या गजरात रॅली निघाली. या रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. करंजेनगर कॉलनीमधून उमेदवारांवर फुलांचा वर्षाव करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

शिक्रापूर येथे दोन पॅनलमध्ये सरळ लढत होत असताना शिक्रापूर ग्रामविकास आघाडी पॅनलच्या माध्यमातून वॉर्ड क्रमांक एक मधून मयूर खंडेराव करंजे, वंदना रमेश भुजबळ व सारिका उत्तम सासवडे हे तिघे उच्चशिक्षित उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने त्यांनी वॉर्डातून मोठी रॅली काढून मतदारांच्या भेटी घेतल्या.

यावेळी मोठ्या संख्येने निघालेल्या रॅलीमध्ये जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, माजी सरपंच आबासाहेब करंजे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबासाहेब सासवडे, स्वप्नील करंजे, उत्तम सासवडे, शैलेश करंजे, ऋषिकेश विटकर, रावसाहेब करंजे, कैलास भुजबळ, रमेश भुजबळ, ऋषीकेश करंजे, खंडेराव करंजे यांसह महिला आणि नागरिकांनी सहभाग घेतला होता. महिलांनी हातामध्ये छत्री, कपबशा तसेच गाडीवर कपाट ठेवलेले असल्यामुळे ही रॅली लक्षवेधी ठरली. करंजे नगरमध्ये रॅलीचे आगमन होताच अचानकपणे मतदारांनी उमेदवारांवर फुलांचा वर्षाव केला.

मतदारांशी संवाद साधताना ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक उपचार पद्धती सुरु करणार असून नामांकित हॉस्पिटलमध्ये नागरिकांना धर्मादाय आयुक्तांच्या निकषानुसार पन्नास टक्के सवलतीच्या दरात उपचार मिळवून देणार असल्याचे मयूर करंजे यांनी सांगितले. तर महिलांना लघु आणि गृह उद्योगासाठी प्रशिक्षण अभियान आणि मागासवर्गीय आणि दिव्यांग व्यक्तींना जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यावर भर देणार असल्याचे सारिका सासवडे यांनी सांगितले.

तसेच महिला, युवती व नागरिकांना निर्भयपणे वावरता यावे यासाठी पोलीस यंत्रणेच्या मदतीने विशेष प्रयत्न करणार असून वॉर्ड ग्रामसभा आयोजित करत नागरिकांचे प्रश्न सोडविणार असल्याचे वंदना भुजबळ यांनी सांगितले. आज निघालेली ढोल ताशांच्या गजरातील रॅली, आमच्यावर झालेला फुलांचा वर्षाव यामुळे आम्ही आजच विजयी झाल्याची भावना सर्व उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

मयूर करंजे “देवमाणूस’ असल्याचे पत्र व्हायरल 

मयूर करंजे यांनी दीड वर्षापूर्वी एका अपघातग्रस्त युवकाला केलेल्या मदतीच्या दातृत्वातून अपघातग्रस्त युवतीची बहिण रुपाली काळे हिने”मयूर करंजे देवमाणूस’ या आशयाचे पत्र लिहिले अरहे. हे पत्र चर्चेचा विषय बनला असून मयूर करंजे यांच्यामुळे माझ्या भावाचा जीव वाचला तर आहे; परंतु करोना काळात असंख्य गरिबांच्या पोटाला त्यांच्यामुळे अन्न मिळाले. देव कोठे आहे की नाही माहित नाही; परंतु मयूर करंजे खरंच देवमाणूस असल्याचे रुपाली काळे या युवतीने पत्रात म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.