शिक्रापूर(प्रतिनिधी) – येथील चाकण रस्त्यावरील मांढरे वस्ती येथे एका इमारतीमध्ये तीन खोल्या भरून साठवलेल्या गुटख्यावर शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकला आहे. यामध्ये लाखो रुपयांचा अवैधरित्या साठविलेला गुटखा व तीन वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. ही घटना रविवारी (दि. 27) दुपारच्या सुमारास घडली.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1341542132852155/
मांढरे वस्ती परिसरात एका इमारतीत तीन खोल्यांमध्ये काही नागरिकांनी अवैधरित्या गुटख्याचा साठा केला होता. त्याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांना माहिती मिळाली होती.
त्यांनुसार सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, पोलीस नाईक तेजस रासकर, रविकिरण जाधव, अंबादास थोरे, अशोक केदार, विकास मोरे आदींनी त्या ठिकाणी छापा टाकला. त्याठिकाणी तीन वाहने तसेच सदर इमारतीच्या खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा साठा मिळून आला. अंदाजे तीस लाख रुपयांचा गुटखा असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
गुटखा आहे की सोनं?
शिक्रापूर येथे गुटखा आढळून आलेल्या इमारतीला असलेली सीसीटीव्ही सुविधा व संरक्षण पाहून या इमारतीमध्ये गुटखा आहे कि सोन असा प्रश्न नागरिकांसह पोलिसांना पडला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात गुटखा येत असतानादेखील प्रशासनाला काहीच माहिती कशी नाही असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे.
मात्र या इमारतीला चारही बाजूंनी सीसीटीव्ही असल्याने शिक्रापूर पोलिसांनी देखील आश्चर्य व्यक्त केले आहे, मात्र या ठिकाणी किती दिवसांपासून गुटखा साठविला जात आहे. सदर गुटखा कोठून येत आहे. याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही.
पोलीस इतर गुटखा विक्रीवर कारवाई करणार का..?
शिक्रापूर येथील गुटखा साठ्यावर कारवाई करून शाबासकी मिळविणारे पोलीस परिसरातील गुटखा विक्रीवर कारवाई करणार का? एक कारवाई करून वरिष्ठांकडून पाठ थोपटून गप्प बसणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
गुप्त बातमीदारामार्फत गुटखा असल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही या ठिकाणी छापा टाकला असता येथे मोठ्या प्रमाणात गुटखा मिळून आला आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासनाला माहिती दिलेली आहे. याठिकाणी मिळून आलेल्या गुटख्याचे मोजमाप सुरु आहे, त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके यांनी यावेळी सांगितले.