शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने मध्यप्रदेशहून घेतले आरोपी ताब्यात
शिक्रापूर (प्रतिनिधी) : पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील चौफुला परिसरात अज्ञात चोरट्यांनी पाच नोव्हेंबर रोजी आयडीबिआय बँकेचे एटीएम फोडून त्यातील २१ लाख ८४ हजार ६०० रुपये लांबविले असताना शिक्रापूर पोलिसांनी या गुन्ह्याचा महिनाभरात तपास करून या गुन्ह्यातील आरोपींना मध्यप्रदेशहून ताब्यात घेत जेरबंद केले असल्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी दिली आहे.
पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील आयडीबिआय बँकेचे एटीएम आलिशान कार मधून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी पाच नोव्हेंबर रोजी एटीएम मधील सीसीटीव्ही वर काळा स्प्रे मारून एटीएम मशीन फोडून त्यातील २१ लाख ८४ हजार ६०० रुपये पळवून नेले होते. त्या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. याबाबत आयडीबिआय बँक शाखा पिंपळे जगतापचे व्यवस्थापक रोहन चावडी पांडे (वय ३७ वर्षे रा. केसनंद रोड वाघोली ता. हवेली जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला होता.
त्यांनतर सदर गुन्ह्याचा तपास करत असताना या गुन्ह्यातील आरोपी मध्यप्रदेश राज्यातील असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यांनतर पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, पोलीस नाईक योगेश नागरगोजे, पोलीस शिपाई निखील रावडे, जयकुमार देवकर, अमोल नलगे, प्रतिक जगताप यांनी थेट मध्यप्रदेश गाठले.
महाराष्ट्रातील अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता – उमेश तावसकर
शिक्रापूर पोलिसांनी एटीएम फोडणाऱ्या परप्रांतीय टोळींचा पर्दाफाश केला असून अटक करण्यात आलेल्या परप्रांतीय टोळीकडून महाराष्ट्रासह इतर राज्यातील अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी सांगितले आहे.
तेथून मासिउल्लाह अख्तर (वय २१ राईपुरी ता. नुहू जि. नुहू राज्य हरियाना), शाहजात उर्फ शहादत हाजर खान (वय २५ वर्षे रा. पिनगुंवा ता. पुनहाना जि. नुहू, राज्य हरियाना), शमशेर उर्फ दलशेर फजरू मेवाती (वय ४० वर्षे रा. गंगोरा ता. पहाडी जि. भरतपूर राज्य राजस्थान), आसमोहम्मद फाजरुद्दिन (वय ३४ रा. नलगीपठाण पोस्ट लगडवास ता. किसनगढ जि. अलवर राज्य राजस्थान), मुशरीफखान उर्फ शरीफ कमरुद्दीन खान (वय वय २७ वर्षे रा. सरस्वत पुनहाना जि. नुहू राज्य हरियाना), शाकीर फजरू मेवाती (वय ३३ वर्षे रा. रा. गंगोरा ता. पहाडी जि. भरतपूर राज्य राजस्थान सध्या रा. गैस राहत कॉलनी ता. निशाद्पूर जि. भोपाळ )या सर्व आरोपींना शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने मध्यप्रदेश येथून ताब्यात घेतले.
वरील सर्व आरोपींनी गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी हे करत आहे.